समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

छत्रपती राजाराम महाराज स्मृतिदिन विशेष

छत्रपती राजाराम महाराज स्मृतिदिन विशेष

#कार्रोफर्र_छत्रपती_राजाराम_महाराज

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यू ची नोंद करताना तारीख ए मोहम्मदी चा कर्ता मुघल मन्सबदार मिर्झा मोहम्मद ह्याने वरील “कार्रोफर्र” हा शब्द प्रयोग केला आहे.

ह्या फारसी शब्दाचा अर्थ म्हणजे शत्रूवर बेडरपणे हल्ले चढवणारा, शत्रूंवर स्वतःचे तेज,दबदबा, व वैभव निर्माण करणारा असा होतो.

तारीख ए मोहम्मदी ह्या ग्रँथात छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यू विषयी नोंद करताना मिर्झा मुहम्मद जे टिप्पन करतो ते पुढील प्रमाणे आहे. (मराठी अनुवाद)

– शहाजी चा नातू व शिवाजी चा मुलगा रामजी उर्फ रामराजा याने आपला भाऊ समभाजी याच्या मृत्यू नंतर दक्षिणेत मोठे तेज दाखवले.

मोघल इतिहासकार साकी मुस्तेईतदखान मासिरे आलमगीरी ह्या त्याच्या ग्रँथात छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूंची नोंद करताना लिहतो की

– दुष्ट रामा वऱ्हाड प्रांताकडे परागंदा होऊन भटकत होता. तो अपयश पत्करून आपल्या देशात परतला आणि नरकाला गेला. (मराठी अनुवाद)

धेर्यशील स्थिरबुद्धि असे स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज ह्यांच्या मृत्यू संबंधी मुघल इतिहासकारांच्या वरील दोन नोंदी जरी एकमेकांशी सुसंगत नसल्या तरी ही प्रथम नोंद ही स्वराज्याच्या ह्या तिसऱ्या छत्रपतींचा समकालीन पराक्रम,प्रताप दर्शवण्यास पुरेपूर समर्थ आहे. व द्वितीय नोंदी वरून ही राजाराम महाराजांनी प्रथम नोंदीत उल्लेख केल्या प्रमाणे मोघलांवर बेडरपने केलेल्या हल्ल्यांचा प्रत्यय येतो.

छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म फाल्गुन पौर्णिमेस शालिवाहन शके १५९१ म्हणजे फिरंगी दि. २४ फेब्रुवारी १७०० रोजी राजगड येथे झाला असला तरीही त्याच काळात झालेल्या स्वराज्याच्या राजधानी स्थालांतराने पुढील १९ वर्षे ते सबंध राज कुटुंब सोबत रायगडावर वास्तव्यास होते.

रायगडावर वास्तव्यास असे पर्यंत

त्यांची पालथे जन्माला आलेल्याची कथा व त्यावर अपशकुन गृहीत धरून नाराज झालेल्या राजपरिवारा समोर शिव छत्रपतींनी व्यक्त केलेले विलक्षण असे मत

७ मार्च १६८० रोजी राजाराम महाराज ह्यांचा झालेला उपनयन संस्कार

शिवछत्रपतींच्या मृत्यू नंतर त्यांच्या राज्यरोहना समबंधीत झालेले कट

त्यांचे महाराणी जानकी बाई व महाराणी ताराबाई ह्यांच्याशी झालेले विवाह

ह्या काही नोंदी मिळतात
(उपनयन संस्काराची नोंद – शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज)

पुढे समभाजी महाराजांनी गादीवर आल्यावर राजाराम महाराजांना अतिशय दयाळूपणे (with all kindness) वागवल्याचा उल्लेख ही १२ जुलै १६८० च्या मुंबईकर इंग्रजांच्या नोंदीत मिळतो त्याच बरोबर समभाजी महाराजांनी येसाजी दाभाडे ह्यांस राजाराम महाराजांच्या ताईनातीत नेमले. ह्याची नोंद ही दभाडेंच्या हकीकतीत मिळते.

समभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर सिंहासन रीक्त न ठेवता महाराणी येसूबाईंनी राजाराम महाराजांना १२ फेब्रुवारी १६८९ रोजी सिंहासनावर बसवले. परंतू राजाराम महाराज सिंहासनावर समभाजी महाराजांच्या बालपुत्राचा अधिकार मानत असल्याने व तो अज्ञान असल्याने त्यांनी केवळ स्वतःचे मंचकारोहन करून घेतले.
(सदर सम्पूर्ण प्रसंग मल्हार राम राव चिटणीस ह्याने त्याच्या बखरीत नोंदवला आहे)

त्यांनंतर लगेच राजाराम महाराजांनी त्यांच्या सम्पूर्ण कुटुंब कबिल्या सोबत व इतर काही महत्त्वाच्या सरदारांसोबत ५ एप्रिल १६८९ रोजी रायगड सोडला.
(संदर्भ – शिवचरित्रप्रदीप)

रायगडावरून निघून महाराज प्रतापगडावर आले. प्रतापगडावर राजाराम महाराज जवळ जवळ चार महिने मुक्काम करून होते. व खऱ्या अर्थाने प्रतापगडाहूनच स्वामींनी स्वरराज्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. महाराजांनी

तयांनी हाती घेतलेले कारभार नक्की कशा प्रकारचा होता हे समजण्यासाठी एक तत्कालीन उदाहरण पुरेसे आहे

पेंडाबे (चिपळूण जवळ) येथे अमात्य नारोपंत ह्यांचे समान लुटारूंनी लुटले ते महाराजांच्या आदेशाने अधिकारी कृष्णाजी गाडे ह्याने ताब्यात घेऊन प्रतापगडावर महाराजांन समोर पेश केले. ते सर्व सामान महाराजांनी अमात्यांकडे पाठवून दिले. मात्र त्यातील एक तोळ्याचे सोन्याचे सुंदर कलमदान महाराजांना आवडले. व ते त्यांनी स्वतःकडे ठेऊन घेतले. मात्र ते कलमदान आवडले म्हणून राजा असल्याने विनामूल्य न घेता त्या बदल्यात कलमदान च्याच वजनाचे सोन (एक तोळे)अमात्यांना देण्या संदर्भात रायगडावरील रत्न शाळेच्या हवालदार बहिर्जी नाईक घाटगे ह्यास आज्ञापत्र पाठवले.

कारभार हातात घेताना त्यांनी नव्या जुन्या सर्व लोकांस जवळ केले. समभाजी महाराजांच्या मृत्यु नंतर नाइलाजाने मोघलांस मिळालेल्या सरदारांस ही त्यांनी परत स्वराज्यात आणले. त्यांना प्रोतसहन देऊन त्यांच्या कडून स्वामीकार्य करून घेतले. त्या संदर्भात त्यांची काही पत्रे आज इपलब्ध आहेत. त्यातील आज उपलब्ध असलेल्या पैकी सर्वात जुने पत्र किंबहुना कारभार हातात घेतला नंतर चे पहिले पत्र १२ एप्रिल १६८९ रोजी त्यांनी मोघलांस सामील झालेल्या सरदार कृष्णाजी गोळे ह्या सरदारस लिहले. व ह्या पत्राद्वारे त्यास अभय देऊन त्याच्याकडील पायदळाच्या शिपायांची वेतन ही सरकारी खर्चातून देण्याची खात्री त्यास करून दिली. अशा प्रकारे स्वराज्य कार्यास एक एक माणूस गोळा करत असतानाच तिकडे औरंगजेब ही त्याचे डाव टाकत होता. त्यास शह म्हणून नाइलाजाने त्यांस वतनदारी पुन्हा सुरू करावी लागली.

रायगडच्या वेढ्या तुन महाराज निसटल्याचे कळताच औरंगजेबाने ही अतिशय जलद असे निर्देश सर्वीकडे रवाना केले. तळकोकणातून महाराज पुढे निसटून जाऊ नये म्हणून सवनतवाडी च्या खेम सवनतास मोघली फर्मान गेले. बेळगावचा मोघली सुभेदार बहादूरखान ह्याचे ही पत्र गोव्याच्या पोर्तुगीजांकडे गेले. एवढ्यावरच न थांबता औरंगजेबाने अब्दूल रजाकखान ह्यास महाराजांच्या मागावर दक्षिण कोकणात पाठवले. हयाच दरम्यान रायगडाला वेढा घालून बसलेल्या झुल्फिकारखानाने ही स्वतःच्या फौजेतील फतेहजंगखान ह्यास महाराजांच्या पाठलागावर पाठवले. परन्तु स्वतः न गेल्याने औरंगजेबाने त्यावर ठपका ठेवला.

याच दरम्यान १० जून १६८९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी एक विलक्षण असा प्रसंग घडला. पायथ्याशी असलेल्या पार ह्या गावात काकरखान ह्या मोघली सुभेदाराची छावणी पडली होती. आबाजी चंद्रराव व हिरोजी दरेकर हे स्थानिक फितूर त्याला हित पर्यंत घेऊन आले होते. त्यांचा मुकाबला करण्या इतपत फौज गडावर न्हवती तरीही आहे ती शिबंदी हाताशी धरून व ह्या फितुरांचा राग मनात धरून स्वतः राजाराम महाराज हत्तीवर स्वार होऊन आपल्या पेक्षा संख्येने जास्त असलेल्या काकरखाना च्या फौजेवर बेदरकार पणे चालून गेले.वेढा घालण्याच्या तयारीत असलेल्या मुघलांना स्वतः मराठ्यांचा राजा असा काही प्रकार करेल ह्याची पुसटशी कल्पना देखील ही न्हवती. अचानक पणे घडलेल्या प्रसंगाने ते हबकून गेले. सुरवातीस काहीसे बेसावध असल्याने त्यांची बरीच माणसे कापली गेली. अनेक जण जवळच असलेल्या कोयनेच्या पात्रात बुडून मेले.

लढाई एन इरेला पेटली असताना लोधी खान हिरोजी दरेकर आबाजी चंद्रराव महाराजांच्या दृष्टीस पडले, तसे चवताळून महाराजांनी त्यांस लक्ष करन्यासाठी हत्ती थेट त्यांच्या फौजेत च घुसवला. व थेट अंबाजी चंद्ररावांच्या अंगावर घातला. हत्तीच्या सोंडेच्या फटकेने चन्द्रराव पाणी ही न मागता जागेवरच ठार झाला. महाराजांचा हा पवित्रा पाहून हिरोजी मात्र आता पूर्णपणे सावध झाला होता. आपण महाराजांचे पुढचं लक्ष आहोत हे ओळखून तो स्वतःहून समोर आला व एन हाणामारीत त्याने हत्तीवर वार करून त्याची सोंडच तोडली. व हा प्रकार पाहून मराठा सरदारांच्या तोंडाला मात्र आता फेस आला होता. लढाईत पिलाजी गोळे, रुमजीराव येरूनकर, जावजी पराटे, ह्या महाराजांच्या सोबत असलेल्या सरदारांनी जीवावर उदार होऊन घडलेल्या प्रसंगा वर वर नियंत्रण मिळवले. व लढाई च्या रणधुमळीतून महाराजांना सुरक्षित पणे बाहेर काढून गडावर सुखरूप पणे घेऊन गेले.

लढाईत झालेल्या प्रकाराने सर्वच जण आवक झाले होते. भोसलेंच्या अंगातील रग आज छत्रपतींनी रणात दाखवली होती. त्यांचे हे तेज पाहून मोघल ही सुन्न झाले होते. गेल्या चार महिन्या पूर्वी पर्यंत कायम गडावर च वास्तव्यास असलेले व लढाईचा कोणताही अनुभव नसताना १९ वर्षाच्या कोवळ्या वयात त्यांनी दाखवलेले धाडस विलक्षण होते. ह्या वरूनच मोघल राजाराम महाराजांचा उल्लेख कार्रोफर्र म्हणून का करत होते ह्याची प्रचिती येते.

पुढे नजीकच्या काही दिवसात जवळीत मोघलांच्या फौज जमू लागल्याने महाराजांनी १० ऑगस्ट १६८९ रोजी प्रतापगड सोडला. व वासोटा – अजिंक्यतारा – सज्जनगड- पन्हाळा असा प्रवास करत महिन्या भरातच पाठीवर मोघली फौज घेऊन पन्हाळ्यावर आले. रायगडावरून निसटून पन्हाळा पर्यंत च्या काळात स्वराज्यात प्रचंड धामधूम उठली होती. परन्तु मोगलांनी त्यांचे लक्ष आता निश्चित केले होते. त्यांना कोणत्याही परिस्थितीत राजाराम महाराज हवे होते. त्या साठी ते कायम त्यांचा पिच्छा पुरवत होते. व इतर गडकोट हस्तगत करण्यासाठी ही बादशाहने मोठ्या फौज रवाना केल्या होत्या. रायगड नंतर इतर ही प्रमुख गडांना वेढे पडले होते. त्यामुळे आता दूर दक्षिणेतील बेलाग असा जिंजी हा पर्याय महाराजांच्या नजरेसमोर होता.

जिंजीस गेल्यास अनेक गोष्टी छत्रपतींना साध्य करण्यास येत होत्या. त्या म्हणजे औरंगजेब जिंजीस गेलेल्या महाराजांच्या मागावर फौज पाठवेल व त्यामुळे स्वराज्यावर आलेला मोगलांचा ताण काहीसा कमी पडन्याची शक्यता होती. व पन्हाळा पासून पुढे जिंजी पर्यंत नवी आघाडी मोगलांना उघडावी लागणार होती. व त्यास रसदेचा कुमक व इतर गोष्टींचा ताप ही होताच. आदिलशाही व कुतुबशाही खालसा झाल्याने निर्माण झालेली पोकळी भरून मोघलां विरुद्ध एक नवीन आघाडी उघडणे शक्य होते.त्यामुळे राजाराम महाराजांनी अतिशय धोरणी विचार करून जिंजीस जाण्याचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला. ह्या निर्णयामुळे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धास एक वेगळीच कलाटणी मिळाली. परंतू औरंगजेबाचा ताप मात्र केईक पटीने वाढला.

छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीस जाण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे जवळ जवळ पन्नास वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक लढाई व मुलकी कारभाराचा अनुभव असलेल्या कुटील व महाधूर्त औरंगजेबास दिलेल्या आपल्या मुत्सद्दीपणा ची पहिली सलामी होती.

जिंजी कडे प्रस्थान करण्या आगोदर छत्रपती राजाराम महाराजांना स्वराज्याची व्यवस्था लावणे अतिशय महत्वाचे होते. त्यास अनुसरून त्यांनी रामचंद्र बावडेकर (पंत अमात्य) ह्यास हुकूमतपन्हाह हा खितांब देऊन सम्पूर्ण स्वराज्याचा अधिकार दिला. व शंकराजी नारो मुकुंद नारायण (पंत सचिव) ह्यास द्वितीय क्रमांकाचे अधिकार देत सातारा ते पुणे व तिथून पुढच्या प्रदेशाचा कारभार सांगितला. ममलकमदार संताजी घोरुपडे व धनसिंगराव धनाजी जाधव ह्या उच्चकोटीच्या लढवय्यांस वरील दोन्ही कारभाऱ्यांच्या अधिकारात दिले. व इतर सरदारांसह कुल फौज ही ह्यांच्याच ताब्यात दिली. जर वतनाच्या काही भानगडी सोडल्यास ह्या दोन्ही करभाऱ्यांनी स्वामींनी त्यांच्या शिरावर टाकलेली जबाबदारी इनामे-इतबारे पार पडली. खरतर ह्या दोन्ही करभरायचे स्वराज्यातील कर्तृत्व हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. एवढे मोठे काम त्यांनी केले आहे.

छत्रपती राजाराम महाराज स्वराज्याची व्यवस्था लावत असतानाच जिंजी च्या प्रवासाचे ही अतिशय सावध व काटेकोर पणे नियोजन करत होते. जिंजी वरून पन्हाळ्याकडे निघताना मार्गात कोण्ही कुठपर्यंत यायचे, कोणी कुठल्या ठिकाणी भेटायचे, कोणी कोणत्या ठिकाणाहून माघारी जायचे ह्या सर्व महत्वपूर्ण बाबींचे नियोजन करण्यात आले होते. त्यास अनुसरूनच सर्वांनी एकत्रपणे न जाता काही सरदार आधीच मार्गातील काही ठिकाणी गुप्त पणे दबा धरून बसले होते.

पण तो पर्यंत मोघली वेढ्याचा फास पन्हाळ्यास पडला होता. तरीही न डगमगता ह्या महातेजस्वी शिवपुत्राने दि.२६ सप्टेंबर १६८९ रोजी काळ्याभिन्न आशा मध्यरात्री पंथोचित वेष धारण करून वेळ प्रसंगी प्राणाची बाजी लावण्यास तत्पर आशा आपल्या काही निवडक सरदार व करभाऱ्यां सह वेढ्यातील मोघली हशमांना चकऊन पन्हाळा सोडला.

परंतु महाराज जिंजी कडे जाणार असल्याचे बातम्या मोघलांना ही आधीच कळल्याने त्यांनी दक्षिणेतील सर्व मोघली ठाण्यांना सावधगिरी चे इशारे दिले होते. सदर विषयावरून बेळगावचा सुभेदार बहादूरखान ह्याने दुसऱ्यांदा पोर्तुगीजांशी पत्र व्हयव्हार केला होता. व स्वराज्यच्या कर्नाटकातील सीमे शेजारील हुकेरी च्या आलंगोंडा देसायास ही खुद्द बादशाहने पत्र लिहून राजाराम महाराज तिकडच्या प्रांतात आल्यास त्यांना अडवण्या समबंधी व त्यांच्या बाबतीत गुप्त खबरा पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या.

परन्तु ह्या उदभवणार्या परिस्थितीचे आगाऊ अंदाज बांधून च महाराज थेट दक्षिणे कडे न जाता. आधी उत्तरेस व मग अनुक्रमे पूर्वेस व नंतर दक्षिणे कडे गेले.

ह्या मार्गात सरदार मानाजी मोरे व सरदार हंबीरराव मोहिते(द्वितीय) ह्यांनी उत्तर – पूर्वेस असलेल्या कृष्णा नदी पासून लक्षमेश्वर पर्यंत महाराजांची सोबत केली.मोगलांना चकवत असताना लक्षमेश्वर येथील अधिकाऱ्यांना महाराजांची खबर लागताच ते त्यांचा पाठलाग करू लागले. पुढे वरदा नदी पार करत असताना मार्गात दबा धरून बसलेले बहिर्जी घोरपडे (हिंदुराव) ह्यांनी लक्षमेश्वर येथील मोघली फौजेस थोपवले. परंतू इथून पुढे संकटांची मालिकाच जणू सुरू झाली. कारण वरदा नदी पार करताच पुढील मोघल तुकडी महाराजांवर चालून आली. परंतू सुदैवाने संताजी जगताप व रुपाजी भोसले हे सरदार पूर्वनियोजित मसलतीप्रमाणे आधीच गुप्तपणे स्थान मांडून असल्याने स्वराज्यावरील संकटाचे निवारण झाले. परंतू तेथील लढाई विस्तार पावत चालल्याने संताजी जगताप ह्यांनी कुल मोघली लष्कर स्वतःच्या अंगावर घेऊन सरदार रुपाजी भोसले ह्याच्या सह महाराजांना पुढे तुंगभद्रे च्या किनाऱ्यावरील शिमोगा पर्यंत पाठऊन दिले.

परंतू पुढे जणू फार मोठे दिव्य मराठयांची वाट पाहत होते. तुंगभद्रा च्या किनाऱ्या वर पोहचोपर्यंत सबंध दक्षिणेत राजाराम महाराज पन्हाळ्यावरून निसतल्याचे वर्तमान पोहचून सर्व बादशाही ठाणेदार, किल्लेदार, व लष्करी अधिकारीही सावध झाले होते. बादशाह च्या हुकुमाने विजापुर चा सुभेदार सय्यद अब्दूलखान बाऱ्हा हा ही ह्या प्रदेशावर पळत ठेऊन असताना त्याला ही महाराजांची ह्या प्रदेशात वावर असल्याची बातमी लागताच त्याने अतिशय वेगवान पधतीने सतत तीन दिवस आणि तीन रात्र घौड दौड करत महाराजांना गाठले.

अब्दूलखांनाच्या ह्या छाप्या वेळी महाराज शिमोगा येथे तुंगभद्रेच्या पत्रातील एका बेटावरऊन पुढे नदी पार करून पुढे जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी हा असा अनामिक प्रसंग उधभवला. मराठ्यांकडे निवडक सरदारांसोबत फौज ही अतिशय कमी असल्याने रुपाजी भोसले ह्याने नेतृत्व करत मोघलांना अडऊन धरले. स्वतः बहिर्जी घोरपडे ह्याने महाराजांना स्वतःच्या पाठीवर घेऊन नदीत उडी मारली. महाराज निघून गेल्यावर मात्र मोगलांचा जोर जास्त असल्याने म्हराठे शरण गेले. व रुपाजी भोसले मालोजी घोरपडे ह्यांसह बरेच मोठे सरदार कैदेत पडले. परंतू हिठेच म्हराठ्यांनी एक विलक्षण असा बनाव केला. निघताना महाराजांनी स्वतःची सर्व राजचिन्हे,अलकांर,वस्त्रे,पागोटे तिथेच टाकले. व त्यांच्या माघारी एक अज्ञात मावळ्याने ते धारण करून आपणच मराठ्यांचे छत्रपती असल्याचे बनाव केला. त्या अज्ञात मावळ्यांचा बनाव एवढा उत्तम होता की अबुलखानाची ही मराठ्यांचा राजा कैद झाल्याची खात्री होऊन त्याने तशी बातमी ही बादशहास कळवली. व ती पुढे स्वराज्य सह सबंध दक्षिणेत पसरली. परंतू गुप्तहेरांकडून वेळो वेळी इतर ठिकाणाहून महाराजांचे कळत असलेल्या वर्तमानातून ती बातमी खोटी असल्याचे बादशहा च्या लक्षात आले. तोपर्यंत मात्र मराठ्यांचा बनाव सिद्धीस जाऊन महाराज पुढे निघून गेले होते. पुढे हे कैद झालेल्यांपैकी संताजी घोरपडे ह्यांनी कारागृहातील अधिकाऱ्यास लावलेल्या कौल मुळे विजापूरच्या कैदेतून काहीजण निसटले परन्तु त्या वेळेस झालेल्या गोंधळामुळे त्यांचे बंधू मालोजी घोरपडे व इतर ८० जण पुन्हा सापडले.तेव्हा बादशाहने त्या सर्वांस ठार केले. महाराजांचे सोंग उठवणाऱ्या त्या मावळ्यांचे नाव व पुढील हकीकत मात्र इतिहासास अजून पर्यंत अज्ञात च आहे.

ह्या गोंधळात नदी पार केल्यानन्तर इतर कारभारी व बहिर्जी घोरपडे ह्यांची चुकांमुक झाल्याने पुढे सतत तीन दिवस महाराज व बहिर्जी ह्या दोघांनी सम्पूर्ण जंगल पायी तुडवत बेदनूरची राणी चेंनमा हिचा आश्रय घेतला. राणीने ही भूतकाळातील शहाजी महाराज व शिवाजी महाराजांच्या उपकारास स्मृरुन मराठ्यांच्या राजास गुप्तपणे राजाश्रय दिला. व तिथे सर्व साथीदारांच्या भेटी नंतर महाराज पुढच्या प्रवासात निघाले.

मात्र आता हेरांचा ससेमिरा चुकवण्या साठी पुढचे अंतर शिपायां नच्या वेशात न कापता यात्रेकरू व्यापारी व इतर विविध वेष परिधान करून पार करावयास लागले. मात्र बंगळूरास थांबले असताना जमवत एक सदस्य महाराजांचे पाय धुत असताना काही स्थानिकांनी पाहिले व एवढ्या जमावातील सदस्य किशोरवयीन मुलाचे पाय धुवत असल्याने त्यांस संशय येऊन त्यांनी स्थानिक मुघल ठाणेदारांना सदर वृत्त कथन केले. तेवढ्यात म्हराठा जमवास ही आपल्या चुकीच्या वर्तनाचा बोध होऊन ते सावध झाले. परन्तु स्थानिकांच्या डोळ्यातील संशयी नजरे मुळे पुढील घडणार्या शक्यतांचा अंदाज घेऊन खंडो बल्लाळ ह्यांनी महाराज व इतर सोबत्यांना पुढील ठिकाण ठरवून वेगवेगळ्या मार्गाने पुढे पाठऊन दिले. व स्वतः मोजक्याच दोन चार धिराच्या पुरुषांबरोबर मागे राहून अतिशय कटू प्रसंगला सामोरे गेले.

महाराज जाताच स्थानिक अमलदाराने तिथे येऊन स्थानिकांच्या बतवणीने अन्न ग्रहण करत असताना खंडोजी बल्लाळ ह्यास इतरांसह कैद करून नेले, सतत तीन-चार दिवस विचारपूस करत असताना उपाशी ठेऊन चाबकाने, दगडाने मारले, राखेचे तोबारे तोंडात भरले. परन्तु सर्व माणसे अतिशय तयारीची असल्याने कोण्हीच ह्या छळासमो र तुटले नाही. व शेवट पर्यंत सर्वांनी आपण व्यापरिच आहोत व जे इतर होते ते ही व्यापरिच असल्याने आप आपल्या मार्गाने पुढे निघून गेले व आम्ही ही रामेशवरी जात असल्याच्या आपल्या वक्तव्यावर ठाम
राहिले. त्यावर ठाणेदाराने विश्वास ठेवून त्यांना मोकळे केले. व पुढे जाऊन ठरलेल्या ठिकाणी महाराजांना मिळाले. खंडो बल्लाळ व इतर साथीदार ह्यांनी ह्या छळास बळी पडून जर सत्य कथन केले असते तर कदाचित स्वराज्याचा कारभार तिथेच आटोपला असता. परंतू स्वतःचा जीव धोक्यात घालून ह्या आधी ही त्यांनी शभाजी महाराजांचे प्राण गोव्याच्या स्वारीत वाचवले होते.

खंडो बल्लाळ ह्याच्या ह्या अटक दरम्यान तिकडे महाराज व इतर साथीदार अतिषय वेगाने मार्गक्रमण करत असताना एक वेळेस महाराजांना दम लागल्याने चालणे असहाय्य झाले होते. परन्तु असे मधेच थांबले असता इतर कोणते संकट येण्याच्या भीतीने प्रहलाद निराजी आवजी (भविष्यातील प्रतिनिधी व जिंजी दरबाराचा मुख्य कारभारी) ह्याने महाराजांना स्वतःच्या पाठीवर घेऊन अनेक मैल धाव घेतली.

आशा सर्व संकटांचा अतिशय धेर्याने सामना करत महाराज मराठयांच्या दक्षिणेतील राज्यातील अंबुर येथे आले. व तिथे पूर्वनियोजित मसल्यास धरून बाजी काकडे ह्या सरदाराने पुढे महाराजांना उघडपणे ससेंन्य वेल्लोरास नेले.२८ ऑक्टोम्बर १६८९ रोजी महाराज पन्हाळा वरून जवळ जवळ ३३ दिवसाची पायपीट करून वेल्लोरास पोहचले.

व तेथून नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात त्यांनी जिंजी च्या गडात प्रवेश केला. ह्या दरम्यान जिंजी येथे अंबिका बाई महाडिक ह्यांनी त्यांस विरोध करण्याचा प्रयत्न केला पण इतरांची साथ न मिळाल्याने तो निषफळ गेला.(राजाराम महाराज्यांच्या बहीण)

परन्तु परिस्थिती अजूनच बिघडत चालली होती.

तुंगभद्रे च्या बेटावर महाराज कैद झाल्याची बातमी ने ही महाराष्ट्रात मोठा परिणाम घडून आला.

राजाराम महाराज कैद झाल्याने रायगढ वेढ्या दरम्यान ही अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील अनुचित प्रसंग टाळण्यासाठी महाराणी येसूबाई साहेब ह्यांनी राजकुटुंबतील सदस्य ह्यांस बरोबर शम्भूपुत्र बाळ शाहू राजे व स्वतःस मोघलांच्या हवाली करून गड ही मोघलांच्या ताब्यात दिला.

महाराज कैद झाल्याचे एकूण व राजधानी वरील राज कुटुंब कैद होऊन रायगड ही पडल्याने अनेक किल्लेदारांनी आता किल्ले मोघलांचौ ताब्यात देऊन मोघली चाकरी स्वीकारु लागले ह्याचा अचूक फायदा नाशिक चा मोगल ठाणेदार मतबरखान ह्याने घेतला व व्यक्तिगत द्रव्य बळ खर्च करून नाशिक जुन्नर व उत्तर कोकणातील अनेक महत्त्वाचे किल्ले ताब्यात घेतले. अनेक सरदारांनी ही वरील बातमीचा परिणाम होऊन मोघली मन्सबदारी स्वीकारली.पन्हाळा चा किल्ला ही ह्याच दरम्यान सर्जेराव घाटगे ह्यांनी मोगलांकडे देऊन त्यांची नोकरी स्वीकारली.

आशा प्रकारे वरील स्वतःवर व स्वराज्यावर आलेल्या प्रानांतीक संकटांवर मात करत कोणत्याही प्रकारे नाऊमेद न होता,छत्रपती राजाराम महाराज ह्यांनी जिंजी येथून मराठयांचा राज्य शकट हकण्यास सुरवात केली.

कारण मराठ्यांचे हे स्वामी अतिशय बेडर,धेर्यवान, धोरणी व दृढनिश्चयी होते. मोघलांच्या भाषेत
कार्रोफर्र.

ह्याचे उदाहरण म्हंनजे छत्रपती राजाराम महाराज ह्यांची औरंगजेबाचे स्वराज्यावरील आलेले परचक्र दूर करून दिल्ली जिंकण्याची महत्वकांक्षा होती.

ह्या समबंधी त्यांनी हणमंतराव घोरपडे व कृष्णाजी घोरपडे ह्या पिता पुत्रास अनुक्रमे ५ लाख व १ लाख पादशाही होणाचा दिल्ली चा सरंजाम दिला होता. ह्या सनद मध्ये दिल्ली बरोबर रायगड, विजापूर, गोवळकोंडा, औरंगाबाद ह्यांचा ही समावेश आहे.

जिंजी येथे राजाराम महाराज पोहचले खरे परंतू स्वराज्याचे धन रायगडावर असल्याने दक्षिणेत त्यांना द्रव्याची अडचण होती. त्यावर महाराजांनी अनेक उपाय योजून धन गोळा केले. ह्या साठी त्यांना दक्षिणेच्या स्वराज्यातील एक किल्ला इंग्रजांना तर पुंडचेरी हे ठिकाणं डचांना विकावे लागले. त्याच बरोबर महाराजांनी दक्षिणेतील राज्यात काही ठिकाणी भेटी दिल्या त्या दरम्यान स्थानिक व्यापाऱ्यांनी व युरोपीय व्यापाऱ्यांनी त्यांना नजराने अर्पण केले.

दक्षिणेत येऊन महाराजांनी एक वेगळेच धोरण आखले.
दक्षिणेतील मोघलांनी जिंकलेल्या दोन्ही शाह्या स्थानिक हिंदू नायकाच्या साथीने जिंकणे हे आपले उद्धिष्ट असल्याचा जाहीर केले.दक्षिणेतील शाह्या मोगलांकडून खालसा झाल्याने व मोघलांच्या वाढत्या धर्मीककृत्यां मुळे धास्तावलेल्यास्थानिक जहागिरदारांन वर ही ह्याचा मराठ्यांना अभिप्रेत असा परिणाम होऊन स्थानिक नायक मराठी राज्यच्या छत्रा खाली एकत्र येऊ लागले.

ह्या पद्धतीने महाराजांनी दक्षिणेत परस्पर चाळीस हजार घोडदळ व पंचवीस हजार पायदळ निर्माण करून मोघलांविरुद्ध एक वेगळीच फळी निर्माण केली.
ह्या फौजेतील पंधरा हजार घोडदळ व पंचवीस हजार पायदळ व सोबतीस एक लाख होणं देऊन केसो त्रिमल ह्याच्या सोबत स्वराज्यात धाडले.

पुढे ह्याच फौजे च्या साथीने संताजी घोरपडे व रामचंद्र पंत व शनकराजी नारायण ह्यांनी मिरज कोल्हापूर, वाई, कऱ्हाड,पाटण सातारा, मवाळ प्रदेश व कोकणातील संगमेशवर,शृंगारपूर इत्यादी प्रदेश ताब्यात घेतला. व ह्याच्या आसमंतातील महिमानगड,गुणवनतगड,सुंदरगड, वसंतगड, राजगड प्रतापगड हे गड कोट ही जिंकले. व ह्याच दरम्यान मराठ्यांनी संताजींच्या नेतृत्वात रुस्तमखानाचा व मुकरबखनाचा दारुण पराभव केला. व वरील रंगारंग पाहून मराठ्यांचे नाइलाजाने मोगलांकडे गेलेले इतर सरदार ही आता नव्या उमेदीने परत फिरले. त्यातील कित्येकांना स्वामींनी कौलनामे दिले आहेत.

स्वराज्यात धाडून दक्षिणेत उरलेल्या फौजेस दक्षिणेतील मोगलांनी घेतलेल्या ठाणी जिंकण्याचा कामगिरीवर महाराजांनी पाठवले. ह्या फौजेने मराठ्यांच्या नेतृत्वात अनेक मोघली ठाणी व किल्ले परत मिळवून हैद्राबादी कर्नाटकचा सुभेदार अस्कर अली बेग ह्यास ही कैद केले.

पुढे झुल्फिकार खानाच्या आगमनावेळी द्रव्याची सतत कमतरता असल्याने ही फौज फुटून आपापल्या ठाण्यात निघून गेली. उरलेल्या फौजेसह याचप्पा नाईक इस्माईलखान मखा त्रिम्बकराव ह्यांनी झुल्फिकारखानाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण अपुऱ्या सेंयबळा मुळे झुल्फिकार खाना समोर त्यांचा टिकाव लागला नाही. पुढे मात्र झुल्फिकारखानाचा वेढ्यात झालेल्या दारुण पराभवाच्या वेळी मात्र केशव रामन्ना ह्याने कांजीवरम ते कुडप्पा पर्यंतचा प्रदेश तेथील किल्य्यांसह ताब्यात घेतला. ह्याच दरम्यान महाराजांनी ही सम्पूर्ण हैद्राबादी कर्नाटक (कुतुबशाही राज्य) जिंकल्याचे फर्मान काढले होते.

ऑगस्ट १६९० मध्ये झुल्फिकारखान जिंजी परदेशात आला, मात्र प्रत्यक्ष वेढा चलऊन हल्ला करण्यास त्याने
ऑक्टोम्बर १६९० पर्यंतचा वेळ घेतला. ह्यास प्रमुख कारण म्हणजे छावणीतून निघताना त्यास जिंजी च्या आवाढवयतेची पूर्ण जाण नसल्याने त्यास त्याच्याकडील सेंन्य बळ कमी वाटू लागले होते. व त्याच्या कडे दारुगोळा ही पुरेसा न्हवता.

तसे पाहता आठ वर्षांच्या वेढ्यात मोगल व म्हराठे ह्या दोन्ही बाजूंचे पारडे कालांतराने जड असे. परन्तु आठ वर्षात हा बेलाग किल्ला जिंकण्यासाठी मोघलांचे बरेच मनुष्यबळ व द्रव्यबळ खर्ची पडले. परंतू मराठ्यांचा राजा काही त्यांच्या ताब्यात आला नाही.

पण राजाराम महाराजांनी जिंजी च्या लढाईत अनेक वर्मी घाव बादशाह स दिले. वेढा चालू असताना त्यांनी खुद्द मुख्य सेनापती झुल्फिकारखान ह्यासच आपल्या बाजूस वळवून घेतले. व पुढे शहजादा कामबक्ष ह्याच्यावर ही यशस्वी जाळे टाकले होते परंतु एन व्हक्ताला वजीर असदखनाने सर्व डाव उधळून लावला.

हयाच दरम्यान महाराज ह्यांनी आपली मतसुद्देगिरी वापरून जिंजी च्या वेढ्यातील म्हराठा सरदारांना महाराष्ट्र्र धर्माची हाक देऊन माणकोजी पांढरे नागोजी माने नेमाजी शिंदे ह्या बड्या सरदारांस वेढ्यातून फोडून त्यांच्या सेंन्य सह गडावर आणले. ह्या घटने मुळे मोघल सेनेचे आत्मबल बरेच खालावले. संताजी व धनाजी ह्यांनीही ह्या दरम्यान दोन वेळा अतुल पराक्रम करून जिंजी चा वेढा उठवला होता.

पुढे दुसऱ्या वेळेस वेध उठल्या नन्तर सेनापती संताजी व छत्रपती राजाराम महाराज ह्यांच्यात बेबनाव होऊन त्याची परिणीती उभयतांमध्ये आयवारकुटी च्या लढाई स्वरूपात झाली.

परन्तु पुढे बादशाह ने झुल्फिकार खानास जास्तच जोर लावल्याने नाईलाज होऊन त्याने जिंजी चा गड ताब्यात घेण्यासाठी निर्वानाचे हल्ले करून १६९७ ला हा गड ताब्यात घेतला. परंतू त्या आधी त्याने महाराजांशी संगनमत करून त्यांना व त्यानच्या कुटुंब कबिल्यास सुखरूपणे किल्ल्यातून बाहेर जाऊ दिले.

जिंजी चा किल्ला मराठ्यांनी गमावण्याची दुसरे प्रमुख कारण म्हणजे संताजी घोरपडे हे मराठ्यांच्या पक्षात नसणे,. त्यांच्या मृत्यू नंतर अवघ्या सहा महिन्यातच मराठ्यांना जिंजी व पर्यायाने सम्पूर्ण दक्षिण गमवावी लागली.एवढा विलक्षण पराक्रम व दरारा ह्या महान सेनापत्तीचा होता.

जिंजी वरून निघताना सुरक्षिततेसाठी महाराजांनी खंडो बल्लाळ ह्याच्या मार्फत जिंजी च्या वेढ्यातील गणोजी शिर्के ह्यास दाभोळ च्या वतना बदल्यात आपल्याकडे वळवले.

२६ डिसेंम्बर १६९७ रोजी वेढ्यातून बाहेर पडल्यावर महाराज व इतर वीस पुरुष बुरखा घालून शिरक्यांच्या महिलांच्या पालखीत बसले व गणोजीच्या तळावर आले. त्यांनतर दुसऱ्या दिवशी शिरक्यांनी शिकारीचा मामला सांगून आपल्या काही माणसांबरोबर महाराज ,येसाजी दाभाडे हे व इतर पुरुषास शिकारीचा वेष परिधान करून छावणीतून बाहेर काढले. मार्गात जळतगतीने मार्ग कर्मन करत असताना येसाजी दभाडे चा प्रवासातील दगदग सहन न होऊन मृत्यू झाला. शिरक्यांनी महाराजांना पुढे रणी च्या किल्ल्या च्या आसमंतात लपून असलेल्या धनाजी जाधव ह्यांच्या फौजेकडे सुपूर्द केले. व मागाहून गिरजोजी यादव राजस्त्रियांना घेऊन आला. ह्या सर्व मामल्यास झुल्फिकार खानाची गुप्त समनती होती. तरीही ह्या प्रकरणात गणोजी शिर्के ह्यास छावणीत अटक झाली होती. वेल्लोर- कोप्पळ-भुदरगड असा परतीचा प्रवास करत राज कुटुंब सोबत महाराज २२ फेब्रुवारी १६९८ रोजी विशाळगडावर पोहचले.

महाराज महाराष्ट्रात परत आल्याने येथील एकूण परिस्थितीचा रंगारंग बदलला, महाराजांच्या पाठोपाठ झुल्फिकार खान खंडणी घेत व खुद्द बादशाह ही सम्पूर्ण छावणी घेऊन महाराष्ट्रात आला. व परत पुन्हा सगळी मुघल फौज महाराजांनी कैद करण्यास माघे लागली. पण ह्यास न जुमानता महाराज आता स्वतः नेतृत्व करत मोहिमे वर जाऊ लागले होते.

१० एप्रिल १६९८ ला महाराज दक्षिण कोकणातील गड कोटांच्या मोहिमे वर गेले. ह्या मोहिमेचा उद्देश म्हणजे आगामी लढ्यची पूर्व तयारी म्हणून गडकोटांवरील फौज,रसद, शस्त्रास्त्रे-दारुगोळा ह्या बाबी मजबूत करून त्यांना सज्ज करणे.ही मोहीम आटपून महाराज प्रतापगड – विशाळगड-सज्जनगड करत साताऱ्यास जुलै १६९८ मध्ये आले.

आता एकूण तयारी झाल्यावर कुल फौज सिद्ध करून महाराज पुन्हा कर्नाटक कडे निघाले मात्र ह्या वेळेस लपूनछपून आश्रयाच्या उद्देशाने न जाता. निधड्या छातीने स्वारीच्या उद्देशाने बाहेर पडून कृष्णेच्या पाण्यातुन त्यांनी आपला घोडा घातला होता. ह्या स्वारीत त्यांनी थोरल्या महाराजांच्या दक्षिण दिग्विजयचीच पुंनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला. त्या साठी जुन्या कुतुबशाही सरदारांस साद घातली. महाराजांची ही स्वारी आक्टोबर १६९८ ते फेब्रुवारी १६९९ ह्या दरम्यान झाली.

(यादव दफतर,गधाधर शकावली, इंग्रज व शिवाजी महाराज दुसरे ह्यांच्या पत्रात महाराजांच्या हा काळातील कर्नाटक प्रवासाचे उल्लेख आहेत.)

है वेळेस आपल्या एका राजकीय खेळीने राजाराम महाराजजांनी सम्पूर्ण मुघल दरबार हदरऊन सोडला.
ह्या मोहिमेच्या तयारी दरम्यान व त्यांनी सगळीकडे बातमी उडऊन दिली की म्हराठ्यांनी औरंगाबादेवर हल्ला करून तेथे कैद असलेल्या कुतुबशाही बादशाह अबुल हसन तानाशह ह्यास सोडवून आणले आहे व लवकरच त्यास हैद्राबाद ला न्हेवुन कुतुबशाही तख्तावर पुन्हा बसवण्यात येईल. येथवरच न थांबता दक्षिण मोहिमेस कूच करताना त्यांनी मोघली सेवेत असलेल्या जुन्या कुतुबशाही सरदारांना पत्रे लिहून आपल्या सोबत असलेल्या तानाशहास येऊन मिळण्याचे आवाहन केले.

महाराजांच्या ह्या खेळीने सम्पूर्ण दक्षिणेत प्रचंड उलथापालथ झाली. हैद्राबादी कर्नाटकातील
पुरदुल्लाखानासारखे अनेक कुतुबशाही सरदार आपल्या फौजेसह व गड कोटां सह म्हराठ्यांना मिळाले. आशा पद्धतीने विनासायास बराच प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आला. पुढे गदग हिठे महाराजांनी शेहजादा बेदरबख्त ह्याच्याशी लढाई ही केली.

मात्र तानाशह समबंधीचा त्यांचा बनाव फुटल्याने अजून पुढे दक्षिणेत न जाता ते तुंगभद्रे च्या तिरा पासूनच माघारी फिरले. बादशाहने स्वतः आदेश देऊन तानाशहास दौलताबाद वरून जाहीररीत्या ग्वाल्हेरच्या किल्ल्यात पाठवले. व हिथे मराठ्यांचा हा राजा कुटील डाव खेळण्यात शिवाजी पेक्षा कमी नसल्याची पुरेपूर प्रचीती बादशाहास आली.

माघारी येऊन विशाळ गडी काही काळ थांबुन एप्रिल १६९८ मध्ये महाराजांनी मागील वर्षी प्रमाणे पुन्हा एक तत्परतेने गडकोटांची व्यवस्था पाहण्याची मोहीम हाती घेऊन ते १८ जून १६९९ रोजी प्रतापगड वर आले. व पुढे पावसाळी मुक्कामास साताऱ्यास राहिले. ह्याच दरम्यान त्यांनी आगामी मोसमातील एक भव्य आशा मोहिमेची आखणी केली. पावसाळ्यातील मुक्कामात औरंजेब स्वतः जातीने स्वराज्याचे गडकोट जिंकण्याच्या मोहिमे वर निघणार असल्याची खात्रीलायक बातमीने ही त्यांचे धेर्य जराही विचलित नाही झाले.ह्या मोहिमे बद्दल त्यांनी बरेच मोठ मोठे मनसुबे आखले होते

ह्या मोहिमेचे स्वरूप हे मोघलांच्या खानदेश व्हऱ्हाड ह्या सुभ्यावर आक्रमण करून ताब्यात घेत पुढे गौंड
(गौंड चा राजा फितून बंड करण्यास तयार झाला होता) च्या राज्यातून मार्गक्रमण करत. हैद्राबादी कर्नाटकात उतरुण मागच्या वर्षी तुंगभद्रेच्या काठी अर्धवट राहिलेली कुतुबशाही मुलूख जिंकण्याची मोहीम (कुतुबशाही च्याच जुन्या सरदारां सोबत) पूर्ण करत पुन्हा शिवछत्रपतींच्या दक्षिण दिग्विजया तील प्रदेशाचा ताबा घेत थेट जिंजी पर्यंत भगवे निशान पुन्हा रोवणें.

ह्या मोहिमेस निघण्या आगोदर त्यांनी साताऱ्यास राजधानी ही केले.व दसर्या नंतर २६ऑक्टोबर १६९९ रोजी सेनापती सह इतर महत्वाच्या सरदारांना घेऊन १९- हजार घोडदळा संगे ते व्हरांड खानदेश च्या मोहिमे वर गेले. परन्तु बादशाह ने मागावर पाठवलेल्या शहजादा बेदरबतख्त,झुल्फिकारखान,चिनकुलीजखान(भावी हैद्राबाद चा निझाम) ह्यांच्या संयुक्त फौजे बरोबर अनेक ठिकाणी झालेल्या धावपळीच्या लढायांमुळे सुरवातीस ह्या मोहिमेची गती थोडी मंदावली. ह्या फौजेस शह देण्यासाठी त्यांनी मार्ग बदलत बारामती वरून पारंडा वर छापा घातला परंतू हिथेही त्यांनी संयुक्त मोघली फौजेशी सामना करावा लागल्याने हिथुन पुढे त्यांनी मूळ फौजेच्या छोट्या छोट्या तुकड्या करत त्यांना मत्ताबर सरदारांच्या सोबत त्यांना नाशिक, बागलाण खानदेश,व्हऱ्हाड कडे पाठवले.व स्वतः ब्रह्मपुरीच्या मोघल छावणीकडे वळले.

ब्रह्मपुरीच्या मोघल छावणी वर हल्ला करण्या मागील हेतू हा अनेक वर्षे कैदेत असलेल्या राज कुटुंबास सोडवणे हा होता.धनाजी जाधव ह्यांनी ह्या हल्ल्याचे नेतृत्व केले. ह्यावेळेस औरंगजेब स्वराज्यातील गड कोट जिंकण्याच्या मोहिमेवर गेल्याने छावणीत सम्पूर्ण फौज न्हवती. ह्याचा लाभ घेत मराठ्यांनी छावणी लुटून बरायच सरदारांचे कबिले कैद केले. ह्यात बादशहच्या एक मुलीला ही मराठ्यांनी कैद केल्याचा उल्लेख परशुराम पंत प्रतिनिधी ह्याच्या समकालीन पत्रात येतो.
( सदर पत्र जेष्ठ इतिहास संशोधक डॉ.आप्पासाहेब पवार ह्यांनी संशोधित केलेले आहे.)

परन्तु नस्त्रतजंग व जुल्फिकार खान एन वख्तला तेथे आल्याने राजकुटुंबाची मात्र सुटका होऊ शकली नाही. व ह्याचा मनास घोर लागून महाराज निराश झाले,ह्या निराशेच्या भरातच आजाराने ही त्यांना घेरले. सतत ची दगदग हे ही आजराचे एक कारण होते.
(ह्या वेळेस छावणीत मराठा राजस्त्रीया असून शाहू महाराज बादशाह बरोबर किल्ले मोहिमेत होते.)

पुढे आजार बळावत गेल्याने सदर व्हऱ्हाड- खानदेश मोहीम सरदारांवर सोपंऊन महाराज सिंहगडावर विश्रांतीस आले. परन्तु नियतीने मात्र और काहीच योजून ठेवले होते. ही मोहीम त्याच्या जीवनातील शेवटची मोहीम ठरली. सिंहगडवर आजारात विश्रांतीस असतानाच देवीच्या रोगाची लागण होऊन छत्रपती राजाराम महाराजांचे शालिवाहन शके१६२१ फाल्गुन कृष्ण नवमी, फिरंगी दि. ३ मार्च १७०० रोजी देहावसान झाले -मृत्यू

आशा प्रकारे छत्रपती राजाराम महाराज ह्यांनी मोघलांविरुद्ध वेगवेगळ्या आघाड्यां उघडून तबबल अकरा वर्षे सतत संघर्ष करत असताना स्वतःच्या तब्यतीची ही काळजी न करता गेलेला प्रदेश परत मिळवून स्वराज्य जीवनत ठेवले.

महाराज हे राज्याचे स्वामी असले तरीही सदर राज्य हे फक्त स्वतःचे वा फक्त भोसले कुळाचे न मानता अवघ्या महाराष्ट्राचे मानत. व त्यांचे हे मनोगत अनेक पत्रात ही व्यक्त झाले आहे. त्यातील काही निवडक उल्लेख पुढील प्रमाणे

पत्र क्रमांक १
हे मऱ्हाठे राज्य. तुम्ही आम्ही मऱ्हाठे लोकी इनामासी खता न करिता मऱ्हाठेधर्माची दुरे धरून स्वामीकार्य करावे.

प्रति – बहिर्जी नाईक घाटगे
(रायगडावरील रत्नशाळेचा हवालदार)
दि. – २३ एप्रिल १६८९

पत्र क्रमांक २
हे स्वामींचे राज्य तुम्हा मराठे लोकांचे आहे.अवघे मिलोन कस्त करिता तेव्हा गनिमाचा काये हिसाब आहे.

प्रति – म्हलारजी भांडवलकर (सेनापंचसहस्त्री)
दि. – २२ सप्टेंबर १६८९

महाराजांच्या जन्माच्या वेळी शिवछत्रपतींनी केलेले भाकीत “पालथा जन्माला आलेला हा पुत्र दिल्ली ची पादशाही पालथी घालील” हे त्यांच्या अकाली मृत्यू मुळे जरी सत्यात उतरले नसले तरी आपल्या राजकीय जीवनात त्यांनी आपल्या राजनीती,रणनीती द्वारे अनेक वेळा डाव प्रतिडाव टाकून अतिशय धूर्त व चलाख मोघल बादशाह औरंगजेब ह्याची मती मात्र अनेक वेळा गुंग केली.

आशा ह्या इतिहास प्रेमींना काहीशा अपरिचित असलेले स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज ह्यांस त्यांच्या स्मृतिदिन निमित्त मानाचा मुजरा.

धन्यवाद

तमाशा कधीचे तुझे इंद्रयुद्ध |
विनाथांब लढण्यात तू जगप्रसिद्ध ||
विरागरणीचे जिने तू ही जगावे |
तमाला गिळोनी जगा उजळवे ||

उजळावया नित्य लागे जळावें |
विना गाडतां बीज का अंकुरावें ||
अतितातूनी कांही आम्ही शिकावें |
झीजोनी स्वयें राष्ट्र हें उधरावें ||

सौजन्य- अभिषेक मंत्र,लोकजगरण

समाप्त

लेखक
रोहित शिंदे

संदर्भ
शिवपुत्र छत्रपती राजाराम
राजारामचरितमानस
शिवचरित्रप्रदीप
शिवचरित्रसाहित्य
पंतप्रतिनिधी बखर
गधाधर शकावली
दाभाडे दफ्तर
यादव दफ्तर
सेनापती धनाजी जाधव
एक झुंज शर्थीची
मार्टिन डायरी(फ्रेंच गव्हर्नर- पोंदेचेरी)
असे होते मोगल
मोगल आणि मराठे (मासिरे इ आलमगिरी)
मोगल दरबाराचा बातमी पत्रे
तारीख इ मोहम्मदी
मराठा रियासत

फोटो साभार
शिवपुत्र छत्रपती राजाराम
आंतरजाल

टीप –
राजाराम महाराजांच्या मृत्यू ची तारीख ही गधाधर शकवलीतील नोंद प्रमाण मानून सदर लेखात ग्राह्य धरण्यात आलेली आहे.

खाली दिलेल्या छायाचित्र पैकी

क्रमांक २ चे छायाचित्र हे छत्रपती राजाराम महाराजांच्या सिंहगडावरील समाधीचे आहे

क्रमांक ३ चे छायाचित्र हे छत्रपती राजाराम महाराजांच्या नित्य पूजेतील शिवपिंडी (चंद्रशेखर बाण) चे आहे.

क्रमांक ४ चे छायाचित्र हे छत्रपती राजाराम महाराजांच्या
नित्यपूजेतील नागदेवता,शिवपिंड व पादुकांचे आहे.

क्रमांक ५ चे छायाचित्र हे छत्रपती राजाराम महाराजांनी हणमंतराव घोरपडे व कृष्णाजी घोरपडे ह्या पितापुत्रास दिलेल्या दिल्ली जिंकून घेण्याच्या सनदेचे आहे.

कृपया लेख पूर्ण वाचवा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवाव्यात.

लेख आवडल्यास कृपया शेअर करून मराठ्यांच्या इतिहास प्रसारणास मदत करावी.

Add Your Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Name *

Your Mail *

Your Comment*