समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

द्रोणागिरी - कारंजा बेटावतील एक प्राचीन दुर्ग

द्रोणागिरी

विजय दिवस १० मार्च १७३९

कारंजा बेटावतील एक प्राचीन दुर्ग,

ह्या दुर्गाने स्वराज्यास बरेच वेळा छळले होते. अगदी शिवछत्रपतींच्या काळात सुद्धा ह्या द्रोणागिरी च्या साथीने पोर्तुगीचांनी वारंवार पनवेलच्या खाडीतून सिंधू समुद्रात उतरणारे मराठ्यांचे आरमार आडविण्याचे दुससाहस केले होते. कैक वेळ ते जाळण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता.

शम्भू काळात १६८४ च्या आधी अल्प काळासाठी द्रोणागिरीवर स्वराज्याचे तोरण चढले होते. परंतू मराठा मोघल धामधुमीच्या काळात गडावर पुन्हा शत्रूचे निशान लागले.

मार्च १७३९ मध्ये
चिमाजी आप्पांच्या नेतृत्वातील वसई मोहीम आता अंतिम टप्प्यात आली होती.जवळ जवळ २ वर्षे ही रणधुमाळी चालली होती.

दोन शतकाहून जास्त काळ धर्मांध जुलूम करणारे पोर्तुगीज सम्पूर्ण उत्तर फिरंगणातून आता उखडले गेले होते. त्यांचे मुख्य ठाणे वसई ही आता शेवटच्या घटका मोजत होते.मराठ्यांकडून जवळ जवळ सर्वच सरदार ह्या मोहिमेत तलवार गाजवत होते.

परन्तु ह्या अंतिम काळात स्वराज्याचे सरखेल आंग्रे मात्र कुलाब्यात एक वेगळाच मनसुबा रचत होते. तिकडे पोर्तुगीच उत्तर कोकणात मेटाकुटीला आले असताना त्यांना आंग्रेंनी घारापुरी च्या समुद्रातील कुलाबाच्या उत्तरेस स्थित कारंजा बेटा वरील द्रोणागिरी गडाचा गुप्त बेत आखला होता.

त्या नुसार सर्व तयारी करून मानाजी आंग्रे ४ मार्च १७३९ रोजी आपल्या आरमारातील ४० गलबतां मधून २००० हजार शिबंदी सह फिरंगी प्रतिकार मोडून काढत कारंजा बेटावर उतरले. बेटावर अदीच आपले माणसे पेरून मराठ्यांनी जवळ जवळ ७००-८०० स्थानिक आपल्या बाजूस वळवले होते.

हा सर्व प्रकार पाहून पोर्तुगीज कप्तान जोसे लुई द सिल्वा ह्याच्या पाचावरच धारण बसली. बघता बघता पूर्ण कारंजा बेट ताब्यात घेत लगेच दुसऱ्या दिवशी मराठे द्रोणागिरी गडास बिलगले.गडा भोवती विस्तिर्ण खंदक खणून त्यातुन तोफांचे मोर्चे लाऊन मराठ्यांनी गडाची तटबंदी व त्यावरील पोर्तुगीजांना अक्षरश भाजून काढले. सतत पाच दिवस हा बेताऱ्यांचा तुफान मारा करत मराठ्यांनी गडास दिलेला वेढा पूर्ण पणे आवळून ठेवला होता. शेवटी सहाव्या दिवशी पोर्तुगीजांनी शरणागती पत्करली. व गड सोडून सुखरूप जाण्यास परवानगी मागत गड मराठ्यांच्या स्वाधीन करत गड ही सोडला.

विजयाच्या जल्लोषात गडाचा ताबा घेताना मराठ्यांनी मात्र शत्रूस दिलेल्या कौल चा व आपल्या परंपरेचे पूर्ण भान राखले होते. त्यांनी बेटा वरील व गडावरील एकही व्यक्तीस इजा न करता त्यांना मुंबई बंदरात सुखरूप उतरवले. द्रोणागिरी व कारंजा चा कप्तान जोसे लुई द सिल्वा ह्यास चौल च्या ठाण्यास पोचते केले.

द्रोणागिरी आंग्रेंनी घेतल्या मुळे मुंबई बेटावर मात्र एकच हाहाकार उडाला. पोर्तुगीजांबरोबर इंग्रज ही पूर्ण पणे भांबावून गेले. खांदेरी नंतर मराठे कारंजा व द्रोणागिरी द्वारे मुबई च्या एवढे जवळ आले होते की आता आज पर्यंत च्या आपल्या कृत्यांचा आंग्रे सूड घेतल्या शिवाय राहणार नाही. अशी इंग्रजांची पक्की खात्री झाली होती.

गेल्या दोन वर्षात समूळ नाश झाल्याने व उरली सुरली शिबंदी वसईत अडकल्याने पोर्तुगीच फिरून मारा करण्यास असमर्थ होते. म्हनून त्यांनी इंग्रजांना ही चुचकारून पाहिले. पण इंग्रजांनी मात्र ह्यातून साफ हात वर केले.

कारण मराठे वसई चा फास पूर्ण पणे आवळून मरोळ पर्यंत सरकले होते. व आपण जर मुंबई तून उठून कारंजा कडे मोर्चे लावले तर डुंख धरून बसलेले हे सह्याद्री चे भूत दर्या भवानी वर स्वार होऊन मुंबई वरील कंपनी चे निशान सिंधू सागरात कायम चेच बुडवतील. अशी भीती ही मुंबई कौन्सिल ला होती.

व आंग्रेंनी भले ही हा गड २००० शिपायांसह जिंकला असला तरी हा मराठी जोर आडवण्यास आपणास मात्र अंदाजे १५ हजार शिपाई लागतील अशी शक्यता मुंबई कौन्सिल ला होती.

द्रोणागिरी सारखे मोक्याचे ठिकाण मराठ्यांकडे गेल्याने शेवटी हताश होऊन इंग्रज ही पोर्तुगीजां पाठोपाठ मराठ्यांकडे तहा साठी गेले. व एक प्रकारे त्यांनी द्रोणागिरी वरील मराठयांच्या अंमलास मान्यताच दिली.

गड ताब्यात आल्यावर सेखोजी सकपाळ ह्यास किल्लेदार म्हणून निवडण्यात आले.

स्वराज्याची पगडी डोईवर चढताच गडा चे गोंडस रूप ही पुन्हा खुलू लागले. त्याची साक्ष आज ही गडा वरील महादरवाजा वरील गेनेशपट्टी चे शिल्प देते. गडावर आज ही विविध बांधकामे ही मिश्रित शैलि ची आढळतात.

पुढे जवळ जवळ शतक भर ह्या गडावर भगवे निशान डौलाने फडकत होते

समाप्त

लेखक – रोहित शिंदे

संदर्भ

पेशवे दफतर भाग 34, पत्र क्रमांक 179
पेशवे दफतर भाग 22, पत्र क्रमांक – १९२
वसईची मोहीम
मराठ्यांचे आरमार
रायगड स्थळ दर्शन
द राईस ऑफ बॉम्बे रेट्रोस्पेक्ट

छायाचित्र साभार

इतिहास अभ्यासक उमेश जोशी सर
(मराठा हिष्ट्री you tube चॅनेल, राफ्टर पब्लिकेशन)

हितेंद्र पाटील
संवर्धन टीम,उरण- सह्याद्री प्रतिष्ठान

टीप –
छायाचित्र क्रमांक ४ हे पेशवे बाजीराव ह्यांनी चिमाजी आप्पा ह्यांस पाठवलेल्या पत्राचा उतारा आहे. (विषय – मानाजी आंग्रेंनी द्रोणागिरी घेतल्याचा)

छायाचित्र क्रमांक ५ हे पेशवे दफतरा तील द्रोणागिरी विजयाची समकालीन नोंद आहे.

कृपया लेख पूर्ण वाचा वा आवडल्यास शेअर करा.

लेख वाचून झाल्या आपल्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्स मध्ये कळवाव्यात

2 Comments

Dr.Atul Bondre – March 10, 2020

हा पूर्ण लेख गडावर लावावा… जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल

Shrutika Dumbre – March 10, 2020

खुप छान

Add Your Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Name *

Your Mail *

Your Comment*