समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

पेशवे बाळाजी विश्वनाथ भट ह्यांची अखेरची स्वारी व मृत्यू - २ एप्रिल १७२०

पावसाळा सरला होता, स्वराज्यात आता सर्व काही गोमटे होते. स्वराज्याची सनद हाती आल्यानंतर जोशींनी नुकतेच उत्तर कोकणातील कल्याण भिवंडी पर्यंत तर धमधेरेंनी पुण्याच्या खालपर्यंत स्वराज्यलक्ष्मी पसरवली होती. दक्षिणेच्या सहा सुभ्याची सरदेशमुखी व चौथाई च्या सनदा मिळाल्या नंतर सरदारांना आता त्यांना वाटून दिलेल्या नव्या प्रदेशात स्वाऱ्या काढण्याचे धुमारे फुटू लागले होते. पेशवा बाळाजी विषवनाथ ही त्यांच्या अखत्यारीत असलेल्या नाशिक, बालाघाटात निघण्यास सज्ज होते.

तेवढ्यात कृष्णेच्या खोऱ्यात काही कटकटी पुन्हा उभ्या राहिल्या. कऱ्हाडचा ठाणेदार पडदुल्लाखान (मोगली ठाणेदार) हा हुकूमाची अंमल बजावणी करत न्हवता. थोरतांना ही पुन्हा जोर चढला होता. तिकडे दक्षिण कोकणात ही वाडीकर व फोंडकरांची आपसात धुसपुस चालू होती.

प्रकरण दिसत होते तेवढे साधे न्हवते. पन्हाळ्यावरून शंभाजी राजे(कोल्हापूर गादी) त्याची सूत्रे हलवत होते. ह्याचा मागमूस बाळाजींना व शाहू महाराजांना लागला होता. त्यात सगळ्यांची एकदमच खोड मोडण्याचा इराद्याने स्वतः शाहू महाराज अजिंक्यतारा वरून बंडखोरांवर चालून गेले. या मोहिमेत बाळाजी विश्वनाथांना ही त्यांनी सोबतीस घेतल्याने नाशिक बालाघाट ची मोहीम लांबणीवर टाकून बाळाजी महाराजांबरोबर मोहिमेवर बाहेर पडले.

महाराजांचा आवेश मोठा असल्याने थोरतांना त्यांचा जोर सोसनार नाही हे शंभाजी महाराज जाणून होते. म्हणून आता पडद्यामागे न राहता तेही फौज घेऊन मैदानात उतरले. थोरातांना पुढे करून मिरज कऱ्हाड इस्लामपूर ही आपली पूर्वीची ठाणी परत मिळवण्याचा त्यांचा सुप्त हेतू होता.

हे सर्व एक होण्याच्या आदी शाहू महाराजांनी त्वरेने कऱ्हाड व इस्लामपूर वर हल्ला करून पडदुल्लाखानास हुसकावून लावले. बाळजींनी पुढे जाऊन थोरतांचे आष्टी व येळवी चे ठाणे जिंकले.परिस्थिती बिघडत असल्याचे पाहुन शंभाजी राजे वडगाव ला शाहू महाराजांच्या मुख्य फौजे वर चालून गेले. परंतू शंभाजी महाराजांचा टिकाव काही लागला नाही. ह्या जोराच्या लढाईत रणदेवतेने शाहू महाराजांना विजयश्री ची माळ घातली. शंभाजी राजांना माघार घ्यावी लागली. पडदुल्लाखान, थोरात व शंभाजी महाराज तिघांना पराभूत करून इस्लामपुर च्या ठाण्यावर अंमल बसवण्यासाठी बाळाजी विषवनाथ ह्यांना पाठऊन महाराज अजिंक्यताऱ्यावर परत निघाले. एक पडदुल्लाखान सोडल्यास थोरातांचे प्रकरण त्यांना वाढवायचे न्हवते. वारणेच्या दोन्ही तिरा सकट हे पाच ही थोरात बंधू त्यांना स्वराज्यात हवे होते.

परंतू थोरातांचे एवढ्या वरून काही भागले न्हवते. महाराज माघारी गेल्याचे व पेशवे इस्लामपूरास अडकल्याचे पाहून त्यांनी कोल्हापूरहून पुन्हा फौज आणून शिराळा, अष्टे, वडगाव मिरज ताब्यात घेतले.

ह्यावेळेस थोरातांकडे कोल्हापूरची फौज असल्याने व इस्लामपूर व कऱ्हाडच्या अंमलावर काही शिबंदी तैनात असल्याने बाळाजी विषवनाथांचे बळ कमी पडत होते.
ही बाब लक्षात येताच शाहू महाराजांनी फत्तेसिंग भोसले (महाराजांचे मानसपुत्र) व पंत प्रतिनिधी ह्यांस मदतीला पाठवले. ह्या तिघांची लगट होताच आष्टी व येळवणीचे ठाणे पुन्हा घेऊन बाळजींनी थोरातांचे बळ बरेच कमी केले.

ह्यांनंतर डिसेंम्बर ते फेब-मार्च असे सलग ती महिने सातारा व कोल्हापूरच्या फौजेचा पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. शेवटी पन्हाळ्याच्या रोखाणे जात असताना पंचगंगा किनारी झालेल्या चकमकीत थोरात बंधू पैकी मुख्य यशवंतराव व शिदोजी मारले गेले.

आता पावसाळ्या नंतर गेले सहा महिने चाललेली मोहीम पूर्ण यशस्वी झाली होती. पडदुल्लाखानाकडून कऱ्हाड व इस्लामपूरचा ताबा मराठ्यांकडे आला होता. थोरातांचा बिमोड झाल्याने वारणेच्या प्रदेशाची ही त्यात भर पडली होती.

परंतू ह्या सर्वांच्या मागे असलेले शंभाजीराजे आता जरी शांत झाले तरी पुन्हा संधी मिळताच पुन्हा त्रास देणार हे बाळाजी जाणून होते. त्यामुळे माघारी न फिरता बाळाजी शंभाजी राजांचा माग काढत त्यांच्या प्रदेशात आले. राजे त्यावेळेस पन्हाळ्यावर होते. गडाचा आवाका माहीत असल्याने तिकडे न फिरकता बाळाजींनी कोल्हापूरच्या वेशीवर ठान मांडले. व बघता बघता पूर्ण कोल्हापूरचा फास आवळला. त्यास प्रत्युत्तरादाखल शंभाजी महाराज स्वतः बाळजींवर चालून गेले. खुद्द धन्याच्या बंधू विरुद्ध शस्त्र धरण्याची वेळ पेशव्यांवर आली होती. परंतू राजकर्तव्य सर्वोत्तपरी मानून बाळजींनी निकराची झुंज दिली. शेवटी काही चकमकी नंतर उरणबाहे(इस्लामपूर) येथे २० मार्च १७२० रोजी मोठे रण झाले. सातारची फौज जास्त असल्याने या रणात शंभाजी राजांची संपुर्ण फौज मोडली गेली.

आता जास्त आढे वेढे घेण्यात अर्थ नसल्याचे जाणून शंभाजी राजांनी स्वतः चा पराभव मान्य करत बाळजींच्या सोबत साताऱ्यास जाऊन छत्रपती शाहू महाराजांनी भेट घेतली. व आपले सर्व अपराध कबूल केले.शाहू महाराजांनी ही उदार मनाने त्याची सर्व कर्मे आपल्या पोटात घेऊन त्यांना माफ करत पुन्हा संतोषाने पन्हाळ्यावर मार्गस्थ केले.

सातारा इस्लामपूर अंतर पाहता ह्या दोन्ही छत्रपती बंधुंची भेट लढाईच्या २-३ दिवस नंतर म्हणजे २२-२३ मार्च ला झाली असण्याची शक्यता आहे.
(तसे अंतर काही तासांचेच आहे)

आशा प्रकारे पडदुल्लखांन व थोरतांवर निघालेली मोहीम शेवटी दोन्ही छत्रपतींच्या दिलजमाई वर येऊन संपूष्टात आली.

ही भेट घडवुन बाळाजींनी बरेच मोठे राजकारण साधले होते. शाहू महाराज सुटून आल्यानंतर गेली १३ वर्षे त्यांचा बराच वेळ इकडच्या आघाडीवर नियंत्रण मिळवण्यात गेला होता. १७१४ च्या सत्तांतरा नंतर शंभाजी राजांनी ही तो संघर्ष पुढे चालू ठेवला होता. परंतू आता दोन्ही राजगादीचे मनोमिलन झाल्याने हा आपसी कलगीतुरा आता शांत होईल असा त्यांचा अंदाज होता.

ह्या वेळेस पेशवे बाळाजी विश्वनाथ ह्यांनी ही शाहू महाराजांचे राजदर्शन घेतले. परंतू हे त्यांचे अखेरचे राज दर्शन ठरले. कारण राजदर्शन घेऊन पुढे सासवड मुक्कामी पोहचताच पेशवे आजारी पडले व अवघ्या काही दिवसात आपल्या स्वभावधर्म प्रमाणे शांत पणे सर्वभक्षी काळाला सामोरे जात शार्वरीनाम संवत्सर, चैत्र शुद्ध ६ शके १६४२ म्हणजेच फिरंगी दिनांक २ एप्रिल १७२० रोजी मृत्यू पावले.

आपल्या आयुष्यात समर्थ मनगटाच्या जोरावर, बुद्धी चतुर्यावर व लघवी संवाद शैली साधत सगळी राजकारण खेळून, कर्तव्य पूर्ण करून शेवटी स्वराज्यलक्ष्मी बळकट करून कर्हे च्या तीरावर स्वराज्याचे हे स्वामीनिष्ठ पेशवे पंचतत्वात विलीन होऊन काळाच्या पडद्याआड गेले.

त्याच्या मृत्यू च्या बातमीने छत्रपती शाहू महाराज ही अतिशय कष्टी झाले. पेशव्यांविषयी महाराजांनी “अतुल पराक्रमी सेवक” असे स्वमुखातून उद्गार काढले.
महाराजांनी राजधानी अजिंक्यतारा वरील सनई चौघडा ३ दिवस बंद ठेवला.

कोकणातून देशावर आल्यावर बाळाजींनी त्यांना संकट काळात ज्यांनी हात दिला. त्यांना बाळाजी स्वतःच्या उत्कर्षात विसरले नाहीत. पुरंदरे व भानू कुटूंब ह्याची साक्ष आहेत.

तीन दशका पूर्वी एक सरकारी वसुली कारकून पद पासून सुरवात करत मतसुद्दीपणा, पराक्रम, स्वामीनिष्ठा, प्रामाणिकपणा ह्या गुणांच्या जोरावर व अंगचे शहाणपण वापरत ते दिम्मत सेनापती, दोन प्रांताचे सरसुभेदार, अमत्यांचे मुतालिक, सेनाकर्ते, आशा प्रवास करत स्वराज्याचे मुख्यप्रधान(पेशवे) झाले.

त्यांच्या समग्र कारकिर्दी बद्दल इतिहासाचार्य राजवाडे खालील प्रमाणे नोंद करतात.

“महाराजांची सेवा निष्ठेने करून, मर्द व शहाणे राज्यात मनुष्य नाना, ऐसा लौकिक वाढवून, महाराजांची कृपा संपादुन प्रधानपद मिळवले. जीवाभयश्रम करून प्रभावाते पाववून महाराजांच्या राज्याचा बंदोबस्त केला.”

असे हे स्वराज्यलक्ष्मी च्या हितासाठी आयष्यभर झटणाऱ्या पेशवे बाळाजी विश्वनाथ भट ह्यांच्या ३०० व्या स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन

पेशवे बाळाजी विश्वनाथ भट

समाप्त

लेखक
रोहित शिंदे

संदर्भ
मराठा रियास्त
मराठ्यांच्या इतिहासाची साधने
मराठी सत्तेचा विस्तार व ऱ्हास
बाळाजी विषवनाथ पेशवे
पेशवाई
मातोश्री

चित्र साभार
आंतरजाल

टीप व छायाचित्रे

सदर लेख मधील शंभाजी महाराज हे छत्रपती राजाराम महाराज ह्यांचे पुत्र व करवीर गादीचे प्रथम छत्रपती आहेत.

हे पेशवे बाळाजी विषवनाथ ह्यांच्या समधीवरील चवथरा चे आहे.
हे चित्र पेशवे बाळाजी विषवनाथ ह्यांच्या समाधी जवळील पुतळ्याचे आहे.
हे पेशवे बाळाजी विषवनाथ ह्यांच्या मुद्रांचे आहे.

धन्यवाद

लेख पूर्ण वाचून आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा.

लेख आवडल्यास शेअर करून आपला इतिहास सर्वांपर्यंत पोहचवा.

1 Comment

Prashant Joshi – April 5, 2020

छान आहे

Add Your Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Name *

Your Mail *

Your Comment*