समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

छत्रपती राजाराम महाराजांनी लढलेले पहिली लढाई

शंभाजी महाराजांच्या अटके नंतर सिंहासन रीक्त न ठेवता महाराणी येसूबाईंनी राजाराम महाराजांना ९ फेब्रुवारी १६८९ रोजी सिंहासनावर बसवले. परंतू राजाराम महाराज सिंहासनावर शंभाजी महाराजांच्या बालपुत्राचा अधिकार मानत असल्याने व तो अज्ञान असल्याने त्यांनी केवळ स्वतःचे मंचकारोहन करून घेतले.

पुढे आख्या मराठी मूलखास हादरवून टाकणारी छत्रपती शंभाजी महाराजांच्या क्रूर हत्येची बातमी ही रायगडावर आली.

रायगडाचा वेढा ही दिवसा गणिक आवळला जात होता.
सर्व बाबींचा सारासार विचार करता सुरक्षतेच्या दृष्टीने सर्व राजकुटुंब एक ठिकाणी राहणे हे धोक्याचे होते.

व ह्याच धोरणास अनुसरून महाराणी येसूबाई साहेब ह्यांच्या समत्तीने छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांच्या सम्पूर्ण कुटुंब कबिल्या सोबत व इतर काही महत्त्वाच्या सरदारांसोबत गुप्त पणे वाघ दरवाजा मार्गे ५ एप्रिल १६८९ रोजी रायगड सोडला.

रायगडावरून निघून फतेहजंगखान, निहारखान,
बक्षी बहरामंखान ह्या शत्रू सरदारांस झुलवत, हुलकावणी देत, जावळी च्या जंगलात, दऱ्या खोऱ्यात पायपीट करायला लावत, महाराज प्रतापगडावर आले.

प्रतापगडावर राजाराम महाराज जवळ जवळ चार महिने मुक्काम करून होते. व खऱ्या अर्थाने प्रतापगडाहूनच स्वामींनी स्वरराज्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली.

शंभाजी महाराज कैद होऊन राजाराम महाराज प्रतापगडा वर पोहचे पर्यंत च्या मधल्या काळात अनेक घडामोडी घडल्या होत्या. भल्याभल्यांची इमाने ढळू लागली होती. स्थानिक कोळी, भिल्ल,मावळे ह्यांना पुढे करत , व प्रसंगी द्रव्याच्या थैल्या रित्या करत मातबरखानं ह्याने जवळ जवळ सबंध उत्तर कोकण व नाशिक मोकळे केले होते. तिथल्या गडकोटांनी स्वराज्यकडे तोंड फिरवत मोघली निशाण अंगावर धारण केले होते.

त्यामुळे ह्या बाक्या प्रसंगी प्रतापगडावरून महाराजांनी स्वराज्यच्या सरदारांना, किल्लेदारांना धीर देणारी,उमेद वाढवणारी,हिम्मत बळावणारी पत्रे लिहत त्यांच्या मनात स्वराज्यज्योत तेवत ठेवली.

परंतु आता नियतीने थेट स्वराज्याच्या धन्यासच आजमवण्याचे ठरवले होते. त्यास कारण असे की प्रताप गडाच्या आसमंतात आता मोघली बावटे दिवसेंदिवस गडद होत चालले होते. प्रतापगडावरील बातम्या राखत व गडावर पुरेशी शिबंदी नाही ह्याची खात्री करून घेत मोघल स्थानिकांच्या मदतीने प्रतापगडास नख लावण्याचे प्रयत्न करत होते. त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी गडावरील शिबंदी ही दात ओठ खात अखंड सावधान पवित्र्यात उभी होती.

याच दरम्यान १० जून १६८९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी एक विलक्षण असा प्रसंग घडला.

पायथ्याशी असलेल्या पार ह्या गावात काकरखान ह्या मोघली सुभेदाराची छावणी पडली होती. आबाजी चंद्रराव व हिरोजी दरेकर हे स्थानिक फितूर त्याला हित पर्यंत घेऊन आले होते. ह्या स्वराज्यद्रोह्यांची पुरती खोड मोडन्याची महाराज आता इरादा करत होते.

त्यांचा मुकाबला करण्या इतपत फौज गडावर न्हवती तरीही ह्या मोघलांस व त्यांच्या अवतीभवती घोटाळणाऱ्या स्थानिकांस धडा शिवकण्याच्या हेतूने आहे ती शिबंदी हाताशी धरून व ह्या फितुरांचा राग मनात धरून स्वतः राजाराम महाराज हत्तीवर स्वार होऊन आपल्या पेक्षा संख्येने जास्त असलेल्या काकरखाना च्या फौजेवर बेदरकार पणे चालून गेले.वेढा घालण्याच्या तयारीत असलेल्या मुघलांना स्वतः मराठ्यांचा राजा असा काही प्रकार करेल ह्याची पुसटशी कल्पना देखील ही न्हवती. अचानक पणे घडलेल्या प्रसंगाने ते हबकून गेले. सुरवातीस काहीसे बेसावध असल्याने त्यांची बरीच माणसे कापली गेली. अनेक जण जवळच असलेल्या कोयनेच्या पात्रात बुडून मेले.

लढाई एन इरेला पेटली असताना लोधी खान हिरोजी दरेकर आबाजी चंद्रराव महाराजांच्या दृष्टीस पडले, तसे चवताळून महाराजांनी त्यांस लक्ष करन्यासाठी हत्ती थेट त्यांच्या फौजेत च घुसवला. व थेट अंबाजी चंद्ररावांच्या अंगावर घातला. हत्तीच्या सोंडेच्या फटकेने चन्द्रराव पाणी ही न मागता जागेवरच ठार झाला. महाराजांचा हा पवित्रा पाहून हिरोजी मात्र आता पूर्णपणे सावध झाला होता. आपण महाराजांचे पुढचं लक्ष आहोत हे ओळखून तो स्वतःहून समोर आला व एन हाणामारीत त्याने हत्तीवर वार करून त्याची सोंडच तोडली. व हा प्रकार पाहून मराठा सरदारांच्या तोंडाला मात्र आता फेस आला होता. हे लढाई चे साहस आता आपल्याच अंगावर उलटते की काय ह्या विचाराने त्यांची पाचावर धारण बसली. परंतु एन लढाईत भोसल्यांना आवरण्यास आभाळ एवढे सामर्थ्य ही पुरे पडत नसे. भोसल्यांच्या गेल्या चार पिढ्यानीं दख्खनेत मारलेली रणमैदाने ह्यास साक्षी होती. पिलाजी गोळे, रुमजीराव येरूनकर, जावजी पराटे, ह्या महाराजांच्या सोबत असलेल्या सरदारांनी जीवावर उदार होऊन घडलेल्या प्रसंगा वर वर नियंत्रण मिळवले. व लढाई च्या रणधुमळीतून महाराजांना सुरक्षित पणे बाहेर काढून गडावर सुखरूप पणे घेऊन गेले.

लढाईत झालेल्या प्रकाराने सर्वच जण आवक झाले होते. भोसलेंच्या अंगातील रग आज छत्रपतींनी रणात दाखवली होती. त्यांचे हे तेज पाहून मोघल ही सुन्न झाले होते. गेल्या चार महिन्या पूर्वी पर्यंत कायम गडावर च वास्तव्यास असलेले व लढाईचा कोणताही अनुभव नसताना १९ वर्षाच्या कोवळ्या वयात त्यांनी दाखवलेले धाडस विलक्षण होते. ह्या वरूनच मोघल राजाराम महाराजांचा उल्लेख कार्रोफर्र (बेदरकार पणे हल्ले चढवणारा) म्हणून का करत होते ह्याची प्रचिती येते.

पुढे नजीकच्या काही दिवसात जवळीत मोघलांच्या पुन्हा फौजा जमू लागल्याने महाराजांनी १० ऑगस्ट १६८९ रोजी प्रतापगड सोडला. व वासोटा – अजिंक्यतारा – सज्जनगड- पन्हाळा असा प्रवास करत महिन्या भरातच पाठीवर मोघली फौज घेऊन पन्हाळ्यावर आले.

तिथून पुढे मराठ्यांच्या इतिहासात एक वेगळेच आख्यायन सुरू झाले – the ग्रेट एस्केप, पन्हाळा ते जींजी प्रवास तर अशी ही होती शिवपुत्राची पहिल्या लढाईची गाथा.

स्वराज्यास जीवनदान देण्यासाठी स्वतः चा आत्मयज्ञ करत स्वराज्याचे भगवे निशाण करोल काळाच्या दाढेतुन सुखरूप पणे बाहेर काढत व पुढे जवळ जवळ एक तप अबाधित राखत सबंध दक्षिण भर यशस्वी नाचवत आपल्या हयातीतच नर्मदेपार न्हेणाऱ्या व कपटनीती व कुटीलविद्या कोळून प्यायलेल्या आलमगीर औरंगजेबास आपल्या स्थिरबुद्धि ने मूत्त्सद्दी पणाचा अचूक नजराणा देत कैक वेळेस निरुत्तर करणाऱ्या

मराठ्यांच्या ह्या कर्रोफर छत्रपती राजाराम महाराज ह्यांच्या चरणी मानाचा मुजरा…..

पालथे निपजले
दिल्लीची पातशाही पालथी घातली
शिवबोल सार्थ केले.

समाप्त

लेखक
रोहित शिंदे
दि. १० जून २०२०

संदर्भ
मराठा मोघल संघर्ष
चिटणीस बखर
ऐतिहासिक साधने
शिवपुत्र छत्रपती राजाराम
थोरले राजाराम महाराज ह्यांचे चरित्र

चित्र साभार
आंतरजाल

टीप
कृपया लेख पूर्ण वाचवा, व आपल्या प्रतिक्रिया व मत खलील कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करावे.

Add Your Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Name *

Your Mail *

Your Comment*