समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

पदांती पंचहजारी राऊतराव बाळोजी नाईक ढमाले

पदांती पंचहजारी राऊतराव बाळोजी नाईक ढमाले

शिवछत्रपतींच्या मृत्यू नंतर बादशाह औरंगजेब सर्वशक्तीनिशी दक्षिणेत उतरला व अडीच दशके यशेच्छ पायपीट करत दक्षिणेतच कायमचा गपगार झाला. परंतू ही अडीच दशके वर लिहलेल्या दोन ओळी सारखी पटकन निघून गेली नाही. ह्या काळात ह्या दक्षिणेच्या प्रदेशाला खूप काही भोगावे लागले. ह्या अडीच दशकात स्वराज्याचे दोन तरुण व खमके छत्रपती काळाच्या पडद्या आड गेले. साडेतीन – चार वर्षांच्या राजपुत्रास तख्त वर बसऊन स्वतः शिवछत्रपतींच्या स्नुषा ह्यांस वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी हाती खडग घेत रणात उतरावे लागले.

जिथे छत्रपतींच्या कुटुंबावर एवढे अस्मानी संकटे कोसळली तिथे रात्रंदिवस रणमैदानात जीवाचा जौहर मांडणाऱ्या इतर सरदारांची काय कथा. मराठ्यांच्या ह्या स्वातंत्र्य युद्धात स्वराज्यलक्ष्मी अबाधित राखण्यासाठी अनेक खंद्या वीरांनी आपले सर्वस्व पणाला लावले.
त्यातील काही मोजके महावीर आकाशातील ध्रुव ताऱ्या प्रमाणे मराठ्यांच्या इतिहासातील अढळ स्थानावर पोहचले. काही मात्र आकाशातील असंख्य गुमनाम ताऱ्यांप्रमाणे इतिहासाच्या पानात उपेक्षित राहिले.

ह्याच उपेक्षित पंक्तीतील एक अज्ञात गंधर्व म्हणजे राऊतराव बळोजी नाईक ढमाले मावळ प्रांत.
मराठ्यांच्या कागतपत्रात ह्यांचा उल्लेख पदांती पंचहजारी असा येतो. (पायदळाचे पंचहजारी सरदार). इतिहास संशोधक, अभ्यासक व इतर काही मोजके सोडल्यास सर्वसामान्य यांस हे नाव सहसा अपरिचितच.

परंतू ह्या अपरिचित विराने मावळात अभूतपूर्व असा गोंधळ घालत एक बत्तीस दातांचा मोघली हिरवा बोकड स्वराज्यलक्ष्मी च्या पायावर बळी दिला होता. परंतू ह्या गोंधळात पोत जाळण्यासाठी ह्या विराने स्वतःचे शरीर ही अर्पण केले.

तर मराठ्यांची ही स्वातंत्र्यलक्ष्मी अबाधित राखण्यासाठी स्वराज्याच्या च्या अग्निकुंडात स्वतःचे प्राण रूपी समिधा अर्पण करणारे पदांती पंचहजारी राऊतराव बळोजी नाईक ढमाले ह्यांस शतशः नमन करत त्यांच्या रुस्तुमीचा, वीरश्री चा जागर आज हिथे आपल्या सर्वांच्या साक्षीने करत आहे.

इ.स.१६९५ चा तो काळ,
दिवाळी संपून नुकतीच थंडीची सुरवात झाली होती.
काही हातघाई चे प्रसंग सोडल्यास तशी देशावर सगळीकडे समशान शांतताच होती.

मूळ रान पेटले होते ते खाली दक्षिणेत, कर्नाटकात वणी – दिडदोरी येथे सेनापतीं संताजी घोरपडे ह्यांनी मोगलांचा आजवर चा औरंगजेब च्या समक्ष दक्षिणेत सर्वात मोठा पराभव केला होता. सेनापतींच्या ह्या पराक्रमाने अख्खी दक्षिण आवक झाली होती.

तिकडच्या बातम्या थोड्याफार फरकाने देशावर पोचत होत्या. देशावरचे कुल राजकारण महाराजांनी अमात्य रामचंद्र पंत व पंत सचिव शंकराजी नारायण ह्यांच्या कडे सोपवले होते.

पंत सचिव शंकराजी नारायण यांनी जमेल तसा हुन्नर लावत स्वतःचा वकुब सिद्ध केला होता. हाताखाली इमानी माणसांची मोट ही बांधली होती. ह्यांच्या कडून चिकाटीने कार्य करवून घेत पंत एक एक गडकोटांचे माप स्वराज्याच्या पदरात घालत होते.

मागे ५ पावसाळ्या पूर्वी असाच मावळातील कोरीगड पंतांनी सोनाजी फर्जंद मार्फत साधला होता.

कोरीगड

परंतू दिवाळी नंतर अचानक एक अप्रिय बातमी पंतांच्या कानावर येऊन आदळली. ती बातमी एकताच कानात कोणी गरम तेल ओतल्याचा पंतांना भास झाला असावा अशी ती बातमी होती.

ती बातमी म्हणजे, जुन्नर चा मोघल ठाणेदार अली बेग ने फितुरी च्या शस्त्रास धार लावत कोरीगड चा घास गिळला होता. गडावरील रायाजी बहुलकर ह्याने मोघलांपुढे आपले इमान नैवेद्य म्हणून पुढे करत कोरीगड ची माळ हिरव्या धाग्यात गुंफत अली बेग च्या गळ्यात घातली होती.

कोरिगडावरील मुख्य अधिकारी त्र्यंबक पंत आणि सहकारी मोरो नारायण लढताना कैद झाले. आबाजी सबनीस, गिरोजी दिनकरराव निंबाळकर ह्या वीरांस मात्र मृत्यूने वरले होते. त्यांनी कोरिगडावर च आपला देह ठेवत स्वतः साठी स्वर्गाची दारे खुली करून घेतली होती.

यादो शमराज व महादजी बाजी ह्यांनी मात्र प्रसंगवधान दाखवत गडावरील इतर सर्व कुटुंब कबिला जोडीस घेऊन पश्चिमेची वाट धरत तिकडील दरवाज्याने वेळेतच गड सोडला अन सुधागड ची वाट धरली म्हणून स्त्रियांच्या वाटेस येणारी पुढची विटंबना टळली होती.

बदललेल्या परिस्थितीचा अंदाज घेत व कोरीगड च्या सर्व बातम्या राखत शंकराजी नारायण पंत सचिव राजगडावर आले होते. व हिथुन च आता ते पूर्ण नियोजन करत व मोहिमेची योग्य ती आखणी करत कोरीगड बाबत पुढची सूत्रे हलवत होते.

सारासार विचार करत त्यांनी पंताजी शिवदेव, चाफाजी कदम, दमाजी नारायण ह्या त्रिमूर्तीस एकत्रित सैन्यबळ देत कोरीगड च्या मोहिमेची जबाबदारी दिली.

चाफाजी कदम हा कोरीगड चा उत्तम जाणकार होता. ह्या आधी ही त्याची कोरिगडावर तैनाती होती. त्यामुळे कोरीगड बद्दल बऱ्याच बारीक सारीक गोष्टी त्यास ठाऊक होत्या. गडावरून सुखरूप सुटलेले यादो शामराज व महादजी बाजी हे ही दिमतीला होतेच. त्यामुळे गडा कडे जाणारी प्रत्येक चोर वाट, पाऊल वाट त्यांनी रोखून धरली होती.

त्याच जोडीला पंताजी शिवदेव, चाफाजी कदम, दमाजी नारायण ह्या त्रिवर्गाने ही अजिबात वेळ न दडवता लगोलग कोरिगडास वेढा दिला. व बघता बघता तो इतका करकचून आवळला की काही केल्या गडावर अडकून पडलेल्या अली बेग ह्यास हा वेढा स्वतः च्या गळ्याला आवळलेला फास असल्याचा प्रत्यय येऊ लागला होता. जर बाहेरून काही मदत मिळाली नाही तर त्यास आता शरणागती शिवाय दुसरा इतर मार्गच शिल्लक न्हवता राहिला.

परंतु त्यास आता एक शेवटची आशा होती ती म्हणजे पुणे प्रांत येथील तळ देऊन असलेला त्याचा पुत्र मन्सूरखान. ह्या मन्सूरखानास अलिबेग ने मदतीसाठी गाऱ्हाने घातले. मन्सूरखान ही मोठ्या तयारीने निघाला. गडास पडलेला वेढा मोडणे व गडावर रसद पोहचऊन गड पुन्हा मजबूत पणे उभा करणे हे दोन उद्धिष्ट त्याच्या समोर होती. तोफा, रसद असा भारी भक्कम लवाजमा घेऊन तो पुण्यातून बाहेर पडला.

तिकडे राजगडावर शंकराजी पंत सर्व खबरा राखून होते.
मावळ खोऱ्यात शिरणाऱ्या ह्या अजस्त्र कंपूस अडवण्यासाठी त्यांना ही एक तेवढ्याच हिमतीचा गडी हवा होता. जो की मावळा चा उत्तम माहितगार ही असावा. ह्या सर्व धांडोळ्यात त्यांची नजर एक जिगरबाज मराठ्यावर येऊन स्थिरावली.

हा मराठा गडी दुसरा तिसरा कोण्ही नसून पौड खोऱ्यातील शतकाहून जास्त काळ ७९ गावांची देशमुखी करणाऱ्या व स्वराज्यसाठी गेले ४ दशके खस्ता खाणाऱ्या ढमाले घराणे च्या माथ्या वरील मुकुट मनी पदांती पंचहजारी राऊतराव बाळोजी ढमाले हे होते. बाळोजी म्हणजे आख्ह मावळ कोळून प्यायलेला माणूस. मावळातील मुख्य वाटा व इतर पाऊल वाटा ह्या सर्वांचा उत्तम माहितगार. मावळातील डोंगर दर्यांच्या अंगाखांद्यावर रात्र न दिवस रपेट करत ह्यांचा देह पोसला गेला होता. शंकराजी पंतांनी मन्सूरखानास अडवण्याची जबाबदारी देऊन एक प्रकारे बाळोजीस प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष पणे मावळ प्रांताचेच रुन उतरवण्याची संधी दिली होती.

मन्सूरखान कितीही तयारीने येत असला तरी बाळोजी त्यास पुरून उरणाऱ्यां पैकी होते. हा गडी मावळातील कोणी सादसुदा शिपाई नसून मराठ्यांचे पंचहजारी सरदार होते. पाच हजार शिबंदी त्यांच्या एका इशाऱ्यावर राऊतराव बाळोजीनीं रोखल्या तलवारीच्या दिशेकडे धिंगाणा घालण्यास सदैव तयार असे. ह्या दिमतीस मावळातील ह्या त्यांच्या भुतखानाच्या तावडीत सापडून बुकलून निघण्याची पाळी मन्सूरखानाची होती.

कोरीगड ची जबाबदारी मिळाल्याने बाळोजी चें मनोधेर्य ही नक्कीच उंचावले होते. कारण कोरीगड आणि ढमाले हे एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. कारण मावळात स्वराज्याचा यज्ञ पेटण्या आधी कैक काळ ढमाले देशमुखांनी कोरीगड आपल्या अजान बाहुत सुखरूप संभाळला होता. कोरीगड बरोबरच मावळातील घनगड, तुंग तिकोना हे किल्ले ढमाले देशमुखांच्याच ताब्यात होते. पुढे स्वराज्य कार्यास प्रतिसाद देत कोरीगड सह ह्या इतर गडानीं ही स्वराज्याचे निशाण आपल्या माथ्यावर लावले. (इ.स.१६५६-५७)

त्यामुळे ढमाले पुरुषांचा कोरिगडाशी एक वेगळाच जिव्हाळा होता. अन आशा परिस्थितीत कोरीगड चा वेढा राखण्याची जबाबदारी बाळोजी ढमाले ह्यांच्या वर आली होती.

पदांती पंचहजारी राऊतराव बाळोजी ढमाले देशमुख ह्यांनी ही आता पुढे सरकनाऱ्या मन्सूरखानाचा वेध घेत आपल्या फौजा मावळात सर्वत्र पसरवत घाट रस्त्यांवर चोख नजर ठेवली होती. त्याच दरम्यान वाळेण मार्गे मन्सूरखान आपली कुल फौज पुढे घेऊन जाणार असल्याचे खात्रीलायक बातम्या बळोजी पर्यंत पोहोचत होत्या. त्याच आधारावर त्यांनी ही पुढील रणनीती प्रत्यक्षात आणण्याचे ठरवत वाळेण लाच मन्सूरखानास जबरदस्त हिसका द्यायचा बेत पक्का केला.

ठरलेले मनसुबे कृतीतून उतरवण्यासाठी वाळेण ला बळोजी ढमाले आपल्या पाच हजार शिपायांसह दबा धरून बसत सावज टप्प्यात येण्याची वाट पाहु लागले.

परंतू शिकारीवर शेवटचा घाव घालण्या आधी सिंह जसा शिकरिस सर्वत्र मैदान भर नाचवतो, पळवून पळवून दमवतो. नेमका तोच खेळ ह्या मन्सूरखान नावाच्या तगड्या शिकार बरोबर मराठ्यांचा अजून एक सिंह सेनासप्तसहस्त्री नावजी बलकवडे (सिंहगड चा दुसरा सिंह) पूर्ण मावळात खेळत होते. सेनासप्तसहस्त्री नावजी बलकवडेंनी मन्सूरखांना भोवती दिवस रात्र नुसतं रान उठवलं होत. प्रत्येक ठिकाणी त्यांनी मन्सूरखानाचा पिच्छा पुरवला होता. मग ते अडचणी च्या ठिकाणी तोफा रेटताना असो वा विश्रांती साठी कुठे घटका भर थांबलेले असताना असो. मोघल जरा निवांत झाले की सेनासप्तसहस्त्री नावजी बलकवडे ह्यांच्या नेतृत्वात मराठ्यांचा सात हजार घोडा मोघलांवर उधळलाच म्हणून
समजा. शेवटी अनेक वेळा आघाडी पिछाडी वर मराठा घोडदळकडून हडकून निघत मन्सूरखान वाळेण ला पोहचला.

वाळेण च्या आसमंतात मोगलांचे स्वागत भयाण शांततेने केले. असे न्हवे की मन्सूरखानास ह्याचा मागमूस ही न्हवता. उलट आतापर्यंत च्या भयाण शांततेने त्याच्या अंगाला – डोक्याला मुंग्या आल्या असाव्या की मराठे आपणास निर्धोक पणे पुढे कसे जाऊ देत आहे. मराठे पुढेही मावळात नक्कीच कुठे ना कुठे आपल्याला गाठनार, ह्या संभाव्य शक्यतेने त्याला ही ग्रासले होते. त्यामुळे तोही टप्प्या टप्प्या वर कानोसा घेत सावध पण संथ पणे आपला तोफखाना व आणलेली रसद घेऊन पुढे पुढे निघाला होता.

शेवटी ज्यासाठी मराठे व मोगलांनी एवढे डाव – प्रतिडाव टाकले होते. तो प्रसंग वाळेण ला उभा ठाकला होता.
मार्गशिष वद्य द्वितीया शालिवाहन शके १६१७, इंग्रजी दिनांक – ५ डिसेंम्बर १६९५ रोजी मोगल तुकडी मन्सूरखानाच्या नेतृत्वात वाळेण वरून पुढे निघण्याच्या तयारीत मार्गक्रमण करत असतानाच मराठ्यांनी पदांती पंचहजारी सरदार राऊतराव बळोजी ढमाले ह्यांच्या नेतृत्वात मन्सूरखानावर झडप घातली.

ही झडप इतकी तीव्र होती की बघता बघता मन्सूरखानाची आघाडी कोसळली. मराठ्यांनी लयबद्ध पद्धतीने चहुबाजूने मोघलांना घेरत त्यांना वाळेण ला कोंडून टाकले. हल्ला एवढा तीव्र होता की आपली जड छावणी स्थिरस्थावर करून मोघलांना लढाईस उभे ही राहत येत न्हवते. आज मोघल दिवसा ढवळ्या मराठ्यांचा गनिमी कावा अनुभवत होते. सुरवातीचा काही वेळ गोंधळात बुडल्याने मोघल धास्तावले होते.त्यात त्यांचे नुकसान ही बरेच झाले. परंतू मोगल हे ही तयारी ने आले होते. काही वेळाने का होईना मोगलांची दुसरी फळी उभी राहिली. व पुढे येऊन मराठ्यांच्या वारास प्रतीवार करू लागली. वाळेण च्या मैदानात आता तलवारीस तलवारी भिडल्या होत्या. बघता बघता मोठी धुमचक्री उडाली. उभयपक्षी दोन्ही कडचे अनेक शिपाई गडी मृत्युमुखी पडले.

बेसावध शत्रूवर स्वतः च्या सोयीच्या ठिकाणी हल्ला करून त्याचे जमेल तेवढे नुकसान करणे व तो सावध होऊन प्रतिकारास उभा राहण्याच्या स्थितीत येई पर्यंत स्वतःचे अतिरिक्त नुकसान टाळण्यासाठी सुखरूप पणे यशस्वी माघार घेत छोटया छोटया तुकडी – तुकडी ने आल्या पाऊली पुन्हा रानावनात गडप होणे. हे मराठ्यांचे वरचढ शत्रू विरुद्ध मूळ युद्धतंत्र असे. मन्सूरखाना कडे तोफा असल्याने हिथे वाळेण च्या रानात ही हेच अपेक्षित होते.

पण आज बाळोजी ढमाले नीं काही और च निर्धार केला होता. त्यात त्यांना सेनासप्तसहस्त्री नावजी बलकवडे ह्यांची खंबीर साथ मिळत होती. आपल्या पूर्वजांनी ज्या कोरिगडाचा कारभार पहिला होता. त्या कोरीगड कडे वाकडी नजर फिरवणाऱ्या मोगलांची वाळेण लाच दफनभूमी करण्याचा त्यांनी इरादा केला होता. अतिशय त्वेषाने त्यांचे खडग मोगलांच्या मानेवरून व छाताडा वरून फिरत होते. फक्त झोंबा झोंबी न करता मन्सूरखानास आज हिथेच बुडवायचा. स्वराज्याचा गाभा असलेला हा पवित्र मुलुख तुडवत मावळ खोऱ्यात घुसण्याचे दुससाहस करणाऱ्या ह्या मोगलांच्या अवलादींचा समूळ नाश करायचाच ह्या त्वेषाने ते लढत होते.

राऊतराव बळोजी ढमाले नचा हा आवेश पाहून मराठा शिपाई ही जोर खाऊन मोगलांवर आदळत होते. काही केल्याने मराठ्यांच्या मनगटी काही सैल पडत न्हवत्या. अजस्त्र तोफगोळ्यांच्या सातत्यपूर्ण अचूक आशा माराने जशी एखाद्या भुईकोटची दुहेरी तटबंदी एकामागून एक कोसळते तशी मोगलांची दुसरी फळी ही गलितगात्र होत रणमैदानात गप गार पडू लागली होती.
उरले सुरले ले अवसान एकत्र करत मन्सूरखांना च्या नेतृत्वात शिल्लक राहिलेल्या इतर मोगली तुकड्या ही वारंवार मराठ्यांचा दम आजमावत होते.

पहिल्या आक्रमनातून सावध होत सातत्याने अंगावर येणाऱ्या मोघलांना भुईवर उताने पाडत असताना मराठ्यांना ही बरीच झळ बसत होती. ह्या रणकंदनात अनेक मराठा वीर कमी आले होते. त्यांची संख्या ही कमी होत होती. मराठ्यांना ही त्याची जाणीव होत होती.
परंतू काळाने ह्या पेक्षा ही मोठा घाव मराठ्यांवर घालण्याचे आज मनावर घेतले होते. यमा च्या शिपायांनी ह्या समरभूमीत मराठ्यांचे नेतृत्व करनाऱ्या पदांती पंचहजारी राऊतराव बळोजी ढमाले ह्या इरेच्या मोहऱ्या वरच आपली नजर रोखली होती. हाती तलवार धारण केलेल्या ढमाले कुळातील ह्या पंचहजारी वीरास बांध घालणे मोगलांच्या आवाक्या बाहेरचेच होते. परंतू आज काळाने च मोगलांच्या हातात हात घातला होता.

शेवटी कैक प्रयत्ना नंतर वारंवार अंगावर येणाऱ्या
मन्सूरखांनाच्या नेतृत्वातील ह्या मोगली वावटळीने डाव साधलाच. वाळेण च्या हया रणधुमाळीत मोगलांनी मराठ्यांचा हा पंचहजारी मोहरा टिपला होता. नक्की अचानक असा काय प्रकार झाला? ह्याचा तपशील इतिहासाच्या दरबारास आजवर तरी कळला नाही. परंतू पौड -कोरबारस खोऱ्यातील स्वराज्यलक्ष्मी चे स्वातंत्र्य अढळ रक्षणासाठी व कोरीगड चा साधत आलेला यशस्वी वेढा राखण्यासाठी मराठ्यांचा सेना नायक राऊतराव बाळोजी ढमाले ह्यांनी आपल्या रक्ताचा मुजरा वाळेण च्या समरभूमीतून सम्पूर्ण बारा मावळा स घातला होता.

आपला सेनानायक धारातीर्थी पडल्याने मराठे पूर्णपणे बिथरले होते. परंतू नेतृत्वहीन झुंड प्रमाणे ते लढाईच्या मैदानातून उधळले गेले नाहीत. उलट रणांगणात पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या आपल्या इतर शिल्लक राहिलेल्या साथीदारांसह त्यांनी मोगलांच्या ह्या उरल्या सुरल्या थव्यावर तडाखेबंद असा निर्वाणीचा हल्ला केला. सुरवातीच्या आक्रमण वेळीसच आपल्या कैक संरक्षण फळ्या कोसळल्या मुळे शेवटी दमुन भागून शिल्लक राहिलेल्या गलितगात्र मोगली फौजेस हा रुस्तमी जोर काही सोसवला नाही. हा हल्ला एवढा जोरकस होता की ह्या हल्ल्यात मुघल सरदार मन्सूरखानाचा घोडा ही रिकामी पाठ घेऊन भुंड्यागत रणात हिंदळू लागला. आता हा नक्की काय प्रकार आहे?,हे समजायला दोन्ही कडच्या पक्षास जास्त वेळ लागला नाही. त्या हिंदकळणाऱ्या घोड्याच्या आसपासच मन्सूरखानाचा उभा आडवा देह निचपत पडला होता. मावळात शिरून कोरीगड च्या वेढ्यास लगाम लावू पाहणारा मन्सूरखान मावळ मातीतच कायमचा गारद झाला. ह्या सर्व प्रकाराने वाळेणच्या रणांगणातून मोगलांचे पाय मात्र उखडले गेले.मराठयांच्या वेशात लढणाऱ्या जगदंबेच्या भुत्यांनी मोगलांचा जवळ जवळ पूर्ण धुरळा उडवून टाकला.
जे ह्या तडाखा तुन वाचले ते सेनासप्तसहस्त्री नावजींच्या तावडीत सापडले.ते म्हणतात ना आगीतून उठले अन फुफुटयात सापडले. मग नावजींनी ही त्यांची तोंडाला फेस आणत योग्य ती मशागत केली. हा मराठ्यांच्या घोडदळ व पायदळ च्या समनव्याचा अतिशय उत्कृष्ठ नमुना होता.

मन्सूरखान पडताच मोगल पराभूत होत प्राण वाचवण्यासाठी आल्या पाऊली माघारी फिरत जीव मुठीत धरून पळत सुटले.ह्या पळपुटया आघाडीवर मन्सूरखानाच्या हाताखालील मुख्य सरदार व इतर सामान्य हशमांनी कोणताही अंगचोर पणा न करता समान सहभाग नोंदवला.मराठ्यांनी बऱ्यापैकी दनागोटा व मोघली रसद मारली.अनेक तोफा व कित्येक घोडी मराठ्यांनी ह्या युद्धात पाडाव केली. मराठ्यांनी त्यांना दिलेल्या कामगिरीचा पूर्ण फडशा पाडत मावळात शिरलेल्या मोगलांचा संपूर्ण नायनाट केला.

ह्या लढाईच्या निकालाने कोरिगडावर ही योग्य तो संदेश गेला. त्यामुळे आधीच गळ्याशी आलेल्या वेढ्याने हात पाय गाळून बसलेल्या अलिबेग ने शंकराजी पंत सचिव ह्यांच्या कडून जीवाचे अभय घेत कोरीगड मराठ्यांच्या स्वाधीन केला. मात्र फितूर रायाजी बहुलकर ह्यास अभय मिळाले नाही.उलट त्या बदल्यात त्यास राजगडाची कैद मात्र नक्की मिळाली. यशस्वी वेढा देणाऱ्या पंताजी शिवदेव, चाफाजी कदम, दमाजी नारायण ह्यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी कोरीगड पुन्हा ताब्यात घेत गडावर कैदेत पडलेल्या मुख्य अधिकारी त्र्यंबक पंत आणि सहकारी मोरो नारायण ह्यांची सुटका करत कोरीगडावर पुन्हा स्वराज्याचे निशाण डौलाने फडकवले.

आपल्या बापजाद्यांनी भूतकाळात राखलेल्या कोरीगड रक्षणार्थ आपले रक्त सांडल्याने पदांती पंचहजारी राऊतराव बळोजी ह्यांचा ढमाले कुळातील हा जन्म मात्र सार्थकी लागला होता.परंतू ह्या कोरिगडावर पुन्हा फडकलेले स्वराज्य निशाण म्हणजेच भगवा जिवंतपणी पाहण्याचे भाग्य सटवाई ने त्यांच्या भाळी लिहले न्हवते. कारण ह्या प्रसंगा आधीच त्यांचे रक्ताने माखलेले शरीर वाळेण च्या समरभूमीत निचपत पडले असताना स्वराज्य नियतीने ते अलगद आपल्या कुशीत घेत ह्या विरास स्वर्गाची दारे सताड उघडी करून दिली होती.

ढमाले कुळाने स्वराज्या साठी गाजवलेल्या हा काही पहिला पराक्रम नसून त्या आधी ही अफजलखान स्वारी वेळी प्रतापगड च्या लढाईत चंद्रराव ढमाले ह्यांनी विशेष तलवार गाजवल्या बद्दल शिवछत्रपतींनी त्यांना खंडणीचे पान बक्षीस दिले होते. बाळोजी ह्यांच्या धारतीर्था मुळे स्वराज्यात ह्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या होत्या. व अर्जोजीराव ढमाले ह्यांच्या पत्नी पुतळाबाई ह्यांस शिवछत्रपतींनी लोहगड च्या घेर्यातील इनाम दिलेल्या दोन गावातील माती ही आज भरून पावली होती. की ह्या मातीतच कसून तयार झालेला देह आज महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य मंदिरातील स्वराज्याच्या पींडिवर नेवेद्य म्हणून चढवला गेला होता.

ह्या लढाईची ठळक बाब ही फक्त मराठ्यांचा फक्त एक पदांती पंचहजारी धारातीर्थी पडला . ही नसून मराठ्यांनी आपल्या पेक्ष्या सुसज्ज सेनेचा तोफखान्या सहित जमाव बुडवला. तेही आपला नायक (मोहीम प्रमुख) गमावून ही फौज माघारी न फिरता शत्रूचा समूळ नाश करत विजयश्री खेचून आणली. असाच पराक्रम मराठ्यांनी २५ वर्षांपूर्वी कोंढण्यावर केला होता. तिथेही मराठ्यांनी आपला सिंह सारखा नायक गमावून ही सूर्याजी मालुसरे ह्यांच्या आवाहना नंतर गड फत्ते केला होता. ह्या दोन्ही घटने वरून (वाळेण व कोंढाणा) मराठ्यांची सेना ही हिंदुस्थानातील इतर लष्कर प्रमाणे फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी फौजेत दाखल होत नसे हे सिद्ध होते.तर त्या उलट शिवछत्रपतींनी त्यांच्या मनात पेटवलेल्या स्फुलिंगामुळे स्वराज्याच्या वेदीवर केव्हाही ते आपलं सर्वस्व अर्पण करण्यास तयार असत.

सवाष्णीच्या घाटमाथ्यावरील कोरीगड तसा कोरबारस व पौड मावळ खोरे च्या रक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा गड इ.स.१६७१ च्या अंदाजपत्रकात शिवछत्रपतींनी ह्या गडासाठी ३००० होणाची तरतूद ही केली होती. ह्या वरून कोरीगड चे महत्त्व आपल्याला अधोरेखित होते.
आज गडावर कोराई मातेचे मंदिर, बुरुज,तटबंदी, तटबंदी तील पाण्याच्या टाक्या हे अवशेष शिल्लक आहेत. पावसाळ्यात व इतर वेळेस शनिवार रविवार दुर्गभ्रमंती करणाऱ्या भटक्यांची बरीच गर्दी कोरिगडावर असते. परंतू ह्या पैकी बरेच जण ह्या कोरीगड च्या रणसंग्राम बद्दल अनभिज्ञ आहेत. त्या मुळे परत कधी तिथे गेल्यावर पदांती पंचहजारी राऊतराव बाळोजी ढमाले,आबाजी सबनीस, गिरोजी दिनकरराव निंबाळकर ह्या वीरांच्या धारतीर्थ बद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या नावाने प्रत्येकी किंवा किमान मिळून एक दिवा कोरई मातेच्या मंदिरात अथवा महादरवाजच्या कमानीत नक्की लावा.

कशासाठी वेलीतरु फुल घ्यावें|
स्वतः जीवनाच्या फुलांनी पुजावें |
असंख्यात पुष्पे हवी पूजनाला |
म्हणा अर्पिला हा देह मायभूला ||

– लोकजगरण (यु ट्यूब)

लेखक
रोहित शिंदे

संदर्भ
सभासद बखर
सनदापत्रे – पृष्ठ क्रमांक १७५ -१७६
कृ वा पुरंदरे सर लिखित पंत सचिव शंकराजी नारायण ह्यांचे चरित्र
शिवपुत्र छत्रपती राजाराम
मराठ्यांची धारतीर्थे
महाराष्ट्रातील सरदारांचे वाडे
मुळशी पेठेचा इतिहास
महाराजांच्या जहागिरीतून
शिवछत्रपतींची पत्रे

फोटो साभार
आंतरजाल

टीप
लेख शी निगडित फोटो अंतरजाल वरून घेतलेले प्रतिकात्मक फोटो आहेत.
कृपया लेख पूर्ण वाचा व आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा.
आपला अज्ञात इतिहास सर्वत्र पोहचवण्या साठी जमल्यास लेख शेअर करा.

Add Your Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Name *

Your Mail *

Your Comment*