समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

सोन्याचे कलमदान आणि स्वराज्याचे छत्रपती

महाराष्ट्राचा ज्ञात इतिहासाचा कालखंड पाहिलात तर ह्या दीर्घ कालावधीत अनेक घराण्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं. त्यात सातवाहन साम्राज्य पासून अगदी बहमनी सल्तन्त पर्यंत सर्वांचा समावेश होतो. ह्या सर्व सत्ता मध्ये एक समांतर बाब अशी की ह्या सर्व सत्ता ह्या त्यांच्या उपनामाणे, कुळाने ओळखल्या गेल्या. मग त्या चालुक्य, यादव सारखे स्वदेशी असो वा आदिलशाह सारखे परकीय सर्वांच्या बाबतीत हाच समान दुवा होय.

परंतु ह्या मांदियाळीत १७व्या व १८व्या शतकात एक अस तेजस्वी पर्व महाराष्ट्राने व पर्यायाने सबंध हिंदुस्थानाने पाहिले की आजही त्याचा जयघोष ह्या मातीत रोजरास पणे होतो. ते तेजस्वी पर्व म्हणजे प्रतिहार व राष्ट्रकूट ह्यांच्या लया नंतर जवळ जवळ ८०० वर्षांनी शिवछत्रपतींच्या अथक परिश्रमातून व ह्या मराठी माय भूमी वर प्रेम करणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या धारतीर्थ ने आकारास आलेले स्वकीयांचे हिंदवी स्वराज्य.

तसे ढोबळमानाने पाहिले तर भोसले कुळातील शिवाजी बिन शहाजी भोसले हयां नरसिंहाने मराठी जनते साठी वेळो वेळी आपलं आयुष्य पणाला लावत निर्माण केलेले राज्य म्हणजे स्वराज्य. हे राज्य निर्माण करताना , ह्याचा प्रशशकीय गाडा हकताना, महाराजांसमोर रयत हीच प्राथमिकता राहिली. त्यामुळे साल्हेर पासून जिंजी पर्यंत पसरलेली ही अजस्त्र दौलत म्हणजे भोसल्यांची खाजगी मालमत्ता असा विचार कधीच समकालीन रयतेच्या किंबहुना आजवर इतर कोणत्याही मराठी माणसाच्या मनात आला नाही. कारण शिव छत्रपती ह्यांच्या नंतर इतर शासकांनी ही मुलकी कारभारात तसाच दंडक घालून दिला होता. ही परंपरा अगदी शंभू छत्रपतींपासून शेवटचे छत्रपती प्रतापसिंह महाराज ह्यांच्या पर्यंत कायम होती.

आज आपण ह्याच मांदियाळीतील एक राजपुष्प पाहणार आहोत.हे प्रकरण आहे स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज ह्यांची नैतिकता व त्यांचे अमात्य नारोपंत ह्यांचे लुटले गेलेले व परत मिळाले ले सामान ह्यांचे.

इ.स. १६८९ चा तो काळ, वैऱ्याने सबंध मराठी मुलखात थैमान घातले होते. स्वराज्याचे धनी शंभू छत्रपती ह्यांस नियती नुकतीच अर्ध्या डावा वरून च घेऊन गेली होती.आशा परिस्थितीत शिव छत्रपतींचे धाकटे सुपुत्र, भोसले कुलोत्पन्न, करोफर, राजाराम महाराज ह्यांनी मंचकारोहन करत स्वतः च्या स्थिरबुद्धि असलेल्या परंतु आयुष्याचे फक्त १९ पावसाळे पाहिलेल्या मस्तकावर स्वराज्याचे पवित्र छत्र धारण करत आपल्या कोवळ्या खांद्यावर ह्या सबंध मराठी माय भूमीच्या रक्षणाचे शिवधनुष्य पेलले होते.

परंतू ह्या शिवधनुष्याची प्रत्युषां मजबूत बांधण्यासाठी त्यांना नाइलाजाने दुर्गेश्वर रायगड चा त्याग करत सह्याद्री च्या दऱ्या खोऱ्यातील अजून एक अजस्त्र असा स्थावर शिपाई, प्रतापगड चा आसरा घ्यावा लागला.

प्रतापगडावर आल्यावर छत्रपतींनी कामाच जोर वाढवत पुढची धोरणे आखण्यास सुरवात केली. त्यास अनुसरून दफत्रातून स्वराज्याच्या सर्व पाईकांस पत्रातून आज्ञा सुटू लागल्या. ह्याच लगबगीत एक पत्र प्रतापगडावरून दुर्गेश्वर रायगडावर रत्नशाळेचे हवालदार बहिर्जी नाईक घाटगे यांस आले.

पत्रातील थोडक्यात मजकूर असा की नारोपंत अमात्य ह्यांस रायगडावरील रत्नशाळेतून १ तोळे एवढ्या वजनाचे सोने देने. पत्र पावताच शिरस्त्याने हवालदार ह्यांनी त्यांचे काम निश्चितच पूर्ण केले.पण रायगड सोडून प्रतापगडावर येईस्तोवर काहीच दिवस लोटले होते. ह्या काळात त्या भागातील एखादं मोठ्या लढाईचे उल्लेख ही सापडत नाही. मग हे एक तोळे सोने देण्याचे नेमके प्रयोजन काय असावे? अमात्य ह्यांची नेमकी कोणती कामगिरी छत्रपतींस पसंत पडली असावी? तर ह्या सर्वांची उत्तरे त्या रायगड च्या रत्नशाळेचा हवालदार ह्यांस लिहलेल्या प्रस्तुत पत्रातच पूर्णपणे सामावली आहेत. फरक एवढाच की सोने देण्याचे प्रयोजन हे अमात्य ह्यांस बक्षीस नसून स्वराज्य च्या स्वामींचे स्वतः स्वतःसाठी घालून दिलेला कारभारी दंडक आहे.

तर मूळ प्रकरण असे की, नारोपंत अमात्य हे काही प्रयोजनास्तव संगमेश्वर येथुन रायगड कडे येत असता मौजे पेंडाबे (चिपळूण जवळील एक गाव) येथे काही पुंडांनी त्यांचे सामान लुटले. अमात्य यांनी लगोलग प्रतापगडावर स्वामींकडे ह्या प्रकरणाची तक्रार करताच महाराजांनी गडावरील कृष्णाजी गाडे ह्यांस तपासासाठी पाठविले. कृष्णाजी ह्यांनी ही स्फूर्तीने तपास घेत अमात्य ह्यांचे लुटीस गेलेले सर्व सामान परत सोडवून आणत प्रतापगडावर स्वामींच्या पायावर ठेवले.

सोडवून आणलेले सामान आणि नारोपंत ह्यांनी लुटीस गेलेल्या सामानाची दिलेली यादी ह्यांची फेर तपासणी करताना त्या सामानाच्या यादीत एक नाजूक शी पण अतिशय सुंदर असे कोरीव नक्षीकाम केलेली एक विलक्षण अशी वस्तू छत्रपती राजाराम महाराजांच्या नजरेस पडली. ती वस्तू म्हणजे एक सुंदर असे कलमदान होते.त्याचे नक्षीकाम व इतर घडीव रचना पाहताच क्षणी महाराजांच्या मनात उतरली. व ही सुंदर वस्तू आपल्या संग्रहात ठेवण्या विषयी चा आपला मोह मात्र त्यांना आवरता आला नाही. व आपली ही इच्छा नारोपंतांसमोर व्यक्त करताच नारोपंतांनी ही मागचा पुढचा कसलाही विचार न करता ते नक्षत्र प्रमाणे सुंदर असे १ तोळा वजनाचे सोन्याचे कलमदान छत्रपतींच्या पायावर अर्पण केले. नारोपंतांच्या ह्या तत्पर कृतीने छत्रपती ही समाधान पावले.

कलमदान

तर ही झाली ह्या रत्नशाळेतून सोने अमात्य यांस दिलेल्या प्रकरणाची एक बाजू, व ह्या प्रकरणाचा उर्वरित भाग हा पुढीलपेमाणे.

छत्रपती म्हणजे स्वराज्याचे स्वामी. हवे ते करण्यास मुखत्यार. १७ व्या शतकातील राज्यकर्ता म्हणजे राज्यांतर्गत सर्व चल अचल संपत्तीचे अलिखित स्वामी.
हा नियम जगभरात जवळ जवळ सर्वच ठिकाणी समप्रमाणात लागू होत होता. परंतु ह्या मराठी मुलखात जगरऱ्हाटी पासून पूर्णपणे वेगळी व जीवंतपनीच स्वर्गसुख देणारी राज्यव्यवस्था नांदत होती. ती म्हणजे छत्रपतींचे स्वराज्य. मराठे लोकांचे राज्य, मऱ्हाठेधर्माचे राज्य. आणि ह्या राज्यव्यवस्थेचे प्रमुख म्हणजेच छत्रपती राजाराम महाराज म्हणजेच साक्षात शिवछत्रपतींचे च अंश

त्यामुळे सुवर्णाचे सुंदर कलमदान का असेना त्यांच्याकडून ते विनापरतावा – विनामूल्य आपल्या संग्रहही ठेवून घेता आले नाही. तसे पाहता त्यांनी विनामोबदला ते स्वतः कडे ठेवून घेतले असते तरी
त्यांना अडवणारे कोणी न्हवते. परंतू साक्षात शिवछत्रपतींच्या रक्तास ते पटणारे न्हवते. कारण मराठ्यांचा हा स्वामी तख्तावर आरूढ झाला होता ते प्रजेचे गोमटे करण्यासाठी. त्यांना नागवण्यासाठी नाही.
म्हणून त्यांच्याकडून शिव छत्रपतींच्या गादीस शोभेल असेच वर्तन घडले

एवढ्या मोगल धामधुमीत ही त्यांनी प्रतापगड वरून दुर्गेश्वर रायगडावर आज्ञापत्र पाठवत रत्नशाळेचे हवालदार बहिर्जी नाईक घाटगे ह्यांस आज्ञा करत ह्या सुवर्ण कलमदान च्या वजना एवढेच म्हणजे एक तोळे सोने नारोपंतां कडे व्यर्ग करण्या चे आदेश दिले. ह्या प्रतापगड वर घडलेल्या घटनेची साक्ष – पुरावा, म्हणजे शिवचरित्रसाहित्य खंड १० मध्ये प्रकाशित असलेले हे सदर पत्र (अनुवादित पत्र खाली फोटो मध्ये पोस्ट करत आहे.)

हे पत्र स्वामींनी शालिवाहन शके १६११ वैशाख चतुर्थदशी म्हणजेच फिरंगी दिनांक २३ एप्रिल १६८९ रोजी लिहले होते. परंतू हे केवळ इतर पत्रांप्रमाणे एक सर्व साधारण पत्र नसून मराठ्यांच्या स्वामींच्या उच्चकोटी च्या असलेल्या नैतिकतेचे अस्सल प्रमाण आहे.

त्या काळात महाराजांनी नुकताच कुठे कारभार हातात घेऊन एखाद मास लोटला होता. सर्वत्र मोघलांना आवरण्याची धांदल सुरू होती. परंतु ह्या परिस्थितीत ही स्वामीं कडून अजिबात हलगर्जी पण न होता आदी लुटारू न कडून वस्तू सोडवून आणल्या व तेवढ्याच तत्परतेने ज्याच्या त्याच्या कडे सुपूर्द ही केल्या. व त्यात स्वतः ठेऊन घेतलेल्या कलमदान बदल्यात तेवढ्याच वजनाचे सुवर्ण मूळ मालकाच्या पदरात घालण्याचे सौजन्य ही दाखवले. अशी तत्परता व नैतिकता इतर कोणाच्या कारभारात पाहायला मिळणे दुरापास्त च. पण ही काम करण्याची पद्धत स्वराज्याच्या कारभारात पहायला मिळत होती. ते सुद्धा थेट छत्रपतींकडून.

तर असा हा एक जगावेगळा मुलकी कारभाराचा नमुना थेट अस्सल दस्तावेज मधून मांडण्याचा हा प्रयत्न. कारण शिव छत्रपती व त्यांच्या कारभाराचे अनेक दाखले आज इतिहास प्रेमींना मुखोदगत होत आहेत. शंभू छत्रपतींच्या चरित्रास ही हल्ली योग्य तो न्याय मिळत आहे. परंतू राजगडावर पालथे जन्माला आलेले स्वराज्याचे हे तिसरे छत्रपती ज्यांनी स्वतःच्या स्थिर बुद्धीने व कररोफर वृत्तीने खाशा आलमगिरच्या मस्तकास अदमासे १ तप मुंग्या आणल्या. ह्या कली काळा सोबत झुंजताना चंदना प्रमाणे स्वतःचा देह झिजवत आपल्या सुगंधी आचरणाने त्यांनी सर्वसामान्य रयत व इतर सर्व सरदारांची स्वराज्य प्रति भावना मात्र अजून पवित्र करत अवघ्या उण्यापुऱ्या ३० व्या वर्षी सिंहगडावर ह्या शिवपुत्राने स्वतःचा देह ठेवला.

तर अशे हे स्वराज्य चे तिसरे छत्रपती राजाराम महाराज स्वतः मात्र काहीशे दुर्लक्षित च राहिले. त्यांच्या कारभाराची ही एक वेगळी सुवर्ण छटा आपणा सर्वांसमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तसे दिल्ली जिंकण्याची विजगुषी वृत्ती बाळगणाऱ्या मराठ्यांच्या ह्या स्वामि च्या चरित्रास येत्या काळात सर्वसामान्य इतिहास प्रेमी न कडून योग्य तो न्याय मिळो हीच अपेक्षा.

समाप्त

लेखक
रोहित शिंदे

संदर्भ
शिवचरित्रसाहित्य खंड १०

चित्र साभार
आंतरजाल